


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.14जानेवारी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपूरी येथे वार्षिकोत्सव 2025 च्या निमित्ताने महाविद्यालयात क्रीडा महोत्सव तथा कला महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आणि प्राविण्य पुरस्कार समारंभाचे आयोजन 11 जानेवारी 2025 ला करण्यात आले होते.यात सत्र 2023-24 या शैक्षणिक सत्रात एच.एस.सी. नागपुर बोर्ड तथा गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले होते. पुरस्कार वितरक म्हणुन म. गांधी कला, विज्ञान व स्व. नसरुद्दिनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरीचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव वारजूकर आर्ट्स, कामर्स कॉलेज, नागभीडचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा ब्रम्हपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रिमा कांबळे, तसेच महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या डॉ. स्निग्धा कांबळे विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देवेश कांबळे यांनी विद्यार्थ्यानी महाविद्यालयातील आयोजित सर्व क्रिडा तथा सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरक डॉ. लालसिंग खालसा यांनी व्यक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी मन, मनगट आणि मेंदूच्या क्षमता समृद्ध करने गरजेचे आहे असे वक्तव्य केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. संजय सिंग यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी महाविद्यालयात आयोजीत विविध स्पर्धा मोलाची भूमिका बजावतात असे विधान केले.
प्रमुख अतिथी रिमा कांबळे यांनी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्याना टिकायचे असेल तर त्यांनी महाविद्यालयात आयोजित सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपली कौशल्ये विकसित करावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्निग्धा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. भिमादेवी डांगे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एन. सी. सी. कडेट्स उपस्थित होते.














