


नवीन वर्षाचा ओनामा होते न होते तेच आजच्या युवकांना ओढ लागते ती प्रेम सप्ताह म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकची…नववर्षाचा पहिला महिना कधी संपतो नि कधी दुसरा महिना सुरु होतो असं वाटायला लागतं. हा महिना सुरु झाला तरी सुरुवातीचे ७ दिवस काढणं खूप अवघड वाटू लागतं. जेव्हा ७ फेब्रुवारीचा सूर्योदय होतो, तेव्हा कुठे जीवात जीव येतं नि १४ फेब्रुवारीला मात्र अख्ख जग जिंकल्याची अनुभूती देऊन जातो.
प्रेम ही एक सुंदर अशी भावना आहे. जीवनात फार कमी लोकांना प्रेमाचे स्वरूप कळते आणि त्याचा आनंद घेता येतो. कारण प्रेमासाठी मन आणि हृदय स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. प्रेम म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणे कठीण आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अनुभवानुसार आणि समजनुसार त्याची व्याख्या करतो. त्यामुळे प्रेमाची परिभाषा व्यक्तिपरत्वे बदलत असली तरीही मात्र त्याचा मूळ एकच असावा. प्रेम कधी व्यक्त करायचे याच्या संदर्भात काही गोष्टी निश्चित आहेत.
प्रत्येक व्यक्ती जीवनात एकदा तरी प्रेमात पडतोच. प्रेमात पडल्यानंतर आपली भावना समोरच्या व्यक्तीसमोर कशी व्यक्त करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी मनात असते ती फक्त भीती आणि संभ्रम… आजच्या काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा क्षण दोघांच्याही कायम स्मरणात राहावा यासाठी काही तरी हटके करण्याचाही काही जण प्रयत्न करतात.
कुणी आवडू लागल्यावर लगेच आपल्या भावना शेअर करणे हे फक्त चित्रमटांमध्येच छान वाटते. परंतु प्रत्यक्षात तसे करणे अजिबात चांगले नसते. आपले प्रेम जाहीर करण्यापूर्वी कमीतकमी ४-५ महिने एकत्र घालवणे आणि ७-८ वेळा सिरीयसली बोलणे महत्त्वाचे असते. कारण एवढा वेळ एखाद्याला वरवर समजून घेण्यासाठी पुरेसा असतो. जो रिलेशनशिप मध्ये येण्यापूर्वी जाणून घेणे महत्त्वाचे असते.काही जण प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा अन्य मॅसेजिंग अॅप्सचा आधार घेतात. यामुळे प्रेम व्यक्त करणं सोपं जात असलं तरी त्या क्षणाची लिखित स्वरूपात आठवण कायमस्वरूपी आपल्या जवळ राहत नाही. त्यामुळे प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करण्यापेक्षा पारंपरिक कागद-पेनाचा वापर करावा. प्रेमाची भावना कागदावर व्यक्त करण्याचे अनेक फायदे आहेत.
एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आवडणे हे अगदी सामान्य आहे. कारण या काळात आपण केवळ त्याचे बाह्य सौंदर्य पाहत असतो. हे एक आकर्षण आहे ज्याला ब-याचदा लोकं प्रेम समजण्याची चूक करतात. अशा परिस्थितीत एखाद्याला आय लव्ह यू म्हणण्याची ती योग्य वेळ नव्हे. जेव्हा केव्हा तुमच्या मनात एखाद्याबद्दल ही भावना असेल, तेव्हा काही दिवस थांबावं आणि स्वतःला विचारावं की तुम्ही प्रेम व्यक्त करण्यात घाई तर करत नाही आहे ना!
प्रेम ही सर्वांत खास अशी भावना असते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडल्यानंतर ते व्यक्त करणं अनेकांना काहीसं अवघड जातं. अगदी सोप्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करण्यासाठी मॅसेजिंग अॅप्सचा वापर केला जातो. यामुळे तो क्षण साजरा होतो; पण मॅसेज कायमस्वरूपी राहत नाही. डिलीट झाल्याने किंवा अन्य काही कारणाने हा मॅसेज आपल्याला परत सापडतोच असं नाही. शिवाय त्याचे दुष्परिणाम देखिल पहायला मिळतात. त्यामुळे कागदावर मॅसेज लिहून खास व्यक्तीकडे आपलं प्रेम व्यक्त करणं केव्हाही चांगलं ठरतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट कागदावर लिहितो तेव्हा त्या गोष्टीची जाणीव आपलं मन आणि मेंदूला असते. त्यामुळे बोलून किंवा मॅसेज करून नाही, तर कागदावर लिहून प्रेम व्यक्त करावं. लेखन आणि वाचनाचा प्रभाव आपल्या मेंदूवर दीर्घ काळ राहतो. त्यामुळे तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर मनातली भावना लिहून व्यक्त करावी.
एकटेपणा दूर करण्यासाठी प्रेम व्यक्त करू नये. नात्यामुळे एकटेपणा दूर होतो. पण एकटेपणा टाळण्यासाठी एखाद्यासोबत प्रेमाचे नाते सुरु करणे ही चांगली कल्पना नाही. कारण अशा परिस्थितीत अनेक वेळा आपण चुकीची निवड करतो आणि एक समस्या टाळण्यासाठी आपण स्वतःला दुस-या समस्येला सामोरे जातो.
प्रेमाविषयी लिहिताना तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीविषयी विचार करता. यामुळे चांगल्या क्षणांच्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आपली भावना लिहू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिहू लागता, तेव्हा तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी तुम्ही बोलून किंवा मॅसेजच्या माध्यमातून व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे प्रेमाची भावना कागदावर उतरवणं केव्हाही चांगलं ठरतं. जेव्हा तुम्ही तुमची प्रेम भावना कागदावर उतरवू लागता, तेव्हा तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीविषयी विचार करू लागता. यामुळे त्या खास व्यक्तीशी निगडित क्षण तुमच्या डोळ्यासमोर येतात. अशा वेळी प्रेमाविषयी लिहिणं सोपं जातं आणि नेमक्या भावना कागदावर उतरतात.
पूर्वीच्या काळी कबुतरामार्फत प्रेमाचा संदेश पाठवला जायचा. हा अनुभव खूपच रोमांचक असायचा. नंतरच्या काळात पत्राच्या माध्यमातून प्रेमभावना संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जायच्या. हे पत्र तो किंवा ती वारंवार लपून वाचत असे. यामुळे प्रेमाची सुंदर भावना मनात दीर्घ काळ कायम राहत असे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी भावना कागदावर लिहाव्यात आणि ते पत्र प्रियकर किंवा प्रेयसीपर्यंत पोहोचवावं, हे आजच्या काळातही प्रभावी ठरू शकेल.
कधी कधी काही लोकांच्या प्रेमाची सुरुवात ही शारीरिक आकर्षणापासून होते. म्हणजे त्या व्यक्तीविषयी मनात काहीच भावना नसतात, पण वय असं असतं जिथं शारीरिक गरज भासते. अशावेळी खोटं खोटं प्रेम व्यक्त करून, शारीरिक वापर करून त्या व्यक्तीला सोडून देणं म्हणजे भूतकाळाच्या पानावर एक ठपका लावून घेण्यासारखं होतं. म्हणून स्वत:ला थोडा वेळ द्यावं. खरं तर आपल्या आयुष्यात येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम, ओढ, माया, आकर्षण वाटत नाही ना. ज्या व्यक्तीविषयी यातील एक जरी गोष्ट वाटते ती आपल्याला कुठेतरी आवडत असते. त्यामुळे शरीरापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावातील काही पटतं का हे बघावं, त्या व्यक्तीला लाईफ पार्टनर बनवू शकता का ते बघावं आणि मगच थेट प्रेम व्यक्त करून आयुष्यभरासाठी त्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या आपल्या आयुष्यात घेऊन यावं.
✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९














