Home महाराष्ट्र दलितमित्र शि.म.जाधव सरांनी केली रामोशी समाजाची अभ्यासपूर्ण मांडणी !

दलितमित्र शि.म.जाधव सरांनी केली रामोशी समाजाची अभ्यासपूर्ण मांडणी !

199

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.1जानेवारी):-उपेक्षित बेडर रामोशी समाजाच्या कथा आणि व्यथा ‘ हे दलितमित्र शि.म‌.जाधव यांनी समाजातील समस्या, व्यथा, दुरावस्था व इतिहास यांची अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात केली आहे. “झुंज” या त्यांच्या प्रसिद्ध व गाजलेल्या आत्मकथनानंतरचे हे प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक होय. सदर पुस्तक सर्व अर्थाने महत्वपूर्ण व दखलपात्र आहे.यामध्ये इतिहास, वर्तमान व भविष्य याची मांडणी केलेली आहे.तसेच विचार,कार्य, अनुभव व अपेक्षा यांची योग्य व मुद्देसूद मांडणी केल्याने नवीन कार्यकर्त्यांना हे पुस्तक दिशादर्शक ठरणारे आहे.रामोशी समाज आज शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक,राजकीय,औद्योगिक, सांस्कृतिक अशा सर्व आघाड्यांवर अप्रगत, अविकसित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटक आहे.

या समाजात अनेक अडचणी, प्रश्न व समस्या आहेत.हे सर्व धाडसाने लेखक जाधव सरांनी मोठ्या धैर्याने कबूल करून त्यावर दुरदृष्टीने कृति कार्यक्रम व योजना सुचवले आहेत. ” आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे स्वतः जाधव सरांनी आपल्या जीवनात प्रतिकूल परिस्थितीतून स्वतः शिकले,पत्नी, मुलांना शिकवले सुसंस्कृत केले, स्वावलंबी बनविले,एक कौटुंबिक आदर्श घालून दिला व त्यानंतर प्रबोधन व उपदेशपर मार्गदर्शन सुरू केले आहे.

प्रस्तुत पुस्तकात जरी फक्त रामोशी जमातीबाबत भाष्य केले असले तरी ते सर्व भटके विमुक्त जमातीसाठी आदर्शवत व संदर्भासाठी उपयोगी व लागू ठरणारे आहे.

सदर पुस्तकाची पाच भागांत मांडणी केली आहे.यामध्ये रामोशी समाजाचा इतिहास व संदर्भ,बेडर रामोशी समाजाची अवस्था व व्यथा,समाज प्रबोधनासाठी उपाययोजना आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे चरित्र व लेखकाच्या कार्याची ओळख अशाप्रकारे पुस्तकात माहिती भरपूर प्रमाणात दिलेली आहे.लेखक शिवाजीराव महादेव जाधव हे सातारा जिल्ह्यातील मार्डी या दुष्काळी तालुक्यातील शिक्षकी पार्श्र्वभूमी असलेले व्यक्तिमत्त्व.आपली अर्धे आयुष्य शैक्षणिक कार्यात खर्ची घालून उर्वरित आयुष्य हे समाजाच्या संघटन, प्रबोधन व हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रमाणात कार्य केले आहे.
उपेक्षित बेडर रामोशी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रामाणिक तळमळ जाधव सरांची आहे.

स्वातंत्र्यानंतर समाजाची हालत अधिक भयंकर होत चालली आहे.त्यास समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, दारिद्रय, व्यसनाधीनता व अपराधीकरण हे ही घटक कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले व त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुलमंत्र व संदेश त्यांनी पुस्तकातून दिला आहे.

सदर पुस्तकात समाजाचा पुर्वइतिहास , पार्श्वभूमी,समाजाचे वर्णन, समाजातील कुळे, संस्कृती, पराक्रमी महामानव, सद्यस्थिती,आरक्षण, मागण्या,समाजाची व्यथा व अवस्था, तसेच काही कर्तबगार व अधिकारी, समाजासाठी प्रबोधन व विकासासाठी उपाययोजना या पुस्तकात दिलेल्या आहेत.हे पुस्तक नवीन कार्यकर्त्यांनी वाचले,अभ्यासले व त्यानुसार वाटचाल सुरू केली तरच नक्कीच समाजाला सोनेरी दिवस येतील,समाजाची सर्वांगीण प्रगती होईल व भविष्य उज्ज्वल होईल.हे मात्र खात्रीशीर सांगू शकतो.
लेखक जाधव सरांची सामाजिक बांधिलकी, विकासाबाबतची तळमळ, मानवतावादी भुमिका, कमालीचा सेवा व परोपकारी वृत्ती,संयमी भावना, अतिउच्च धिरोधात्तपणा, अविचल निष्ठा, आधुनिक विचार, सामाजिक दायित्व व समविचारी मंडळींना जोडून घेण्याचे कौशल्य हे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात, आचारात व पुस्तकातून सतत जाणवत राहते.

हे पुस्तक सर्व बहुजन कार्यकर्ते, वंचित समाजातील तरूण अभ्यासक, संशोधक, सामाजिक चळवळीत कार्यरत कार्यकर्ते व प्रशासकीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या सर्वांनी वाचलेच पाहिजे.कारण हे पुस्तक म्हणजे म्हणजे चालता बोलता आचरणात आणण्याचा दस्तऐवज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here