Home लाइफस्टाइल सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन पाच जानेवारीला

सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन पाच जानेवारीला

252

▪️धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत, मधुकर शिर्के यांना जाहीर

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1जानेवारी):- भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे मानवतावादी विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे या धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एकदिवसीय सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवार दि. 5 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10:30 वा. होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी दिली.

सुप्रसिद्ध विद्रोही शाहीर संभाजी भगत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर शिर्के यांना या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा सातवा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दहा हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे उदघाटन सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते व्यंकाप्पा भोसले हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत.दिवसभर चालणाऱ्या या संमेलनास अनिल म्हमाने, एस. पी. दीक्षित, रंगराव पांडे, सुरेश केसरकर, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. शोभा चाळके, अनिता काळे, उदय कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या सत्रात कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व लेखक डॉ. किरण भिंगारदेवे हे असणार आहेत. यावेळी निमंत्रित कवी तसेच निवडक नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, अनिता गायकवाड, विमल पोखरणीकर, अंतिमा कोल्हापूरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here