


राहुरी (प्रतिनिधी) : “आत्मविश्वास वाढवण्याचे काम पुस्तके करत असून वाचनाने प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडू शकते, यासाठी वाचन आवश्यक असून वाचन करणारी माणसे जीवनामध्ये सुखी,समाधानी आणि समृद्धी झालेली दिसून येतात,” असे मत माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी व्यक्त केले
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे श्री.त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालय च्या वतीने मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुस्तक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी ग्रंथपाल रेवजी सांबारे, कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर, सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, अग्निशमन अधिकारी गोपाळ भोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरामध्ये वाचनाची चळवळ वाढवण्यासाठी या वाचनालयाचा मोठा वाटा असून यामुळे स्पर्धा परीक्षेमध्येही अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे ही बाब या शहराचे नावलौकिक वाढवणारी आहे. नविपिढी घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी उपक्रम होत आहेत.
मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की, “ वाचनालयाच्या वतीने आता वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांपर्यंत पुस्तके जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, महाविद्यालयीन युवक, युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व संदर्भ ग्रंथांचा लाभ देता येईल, आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी होत असलेला हा कार्यक्रम निश्चितच सर्वांना प्रेरणा देईल.” यावेळी वाचक भास्कर जाधव, पत्रकार राजेंद्र उंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुनील गोसावी करून दिला. तर शेवटी कार्यालयाने अधीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले.
यावेळी राजेंद्र चव्हाण, सारंगधर टिक्कल, राजेंद्र कदम, गोरक्षनाथ भांगरे, सुभाष कुलट, विजय साठे, नंदू शिरसाठ,नागेश भालेकर,राजेंद्र पोकळे,राजेंद्र हारगुडे, अश्विनी भांगरे, गौरव जेधे यांच्या सह शहरातील वाचक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













