


नाशिक प्रतिनिधी -शांताराम दुनबळे
नाशिक – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे २५ जूलै २०२४ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ५० टक्के अवार्ड डेट नुसार अधिछात्रवृत्ती देण्याच्या निर्णयाविरोधात २०२२ च्या अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांने अंगावर पेट्रोल ओतून बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळेस त्या संशोधक विद्यार्थ्यांने १०० टक्के दराने अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांक पासून देण्यात यावी या मागणी संदर्भात घोषणाबाजी केली तसेच ‘हम हमारा हक्क मांगते नही किसी से भीक मांगते’ व ‘जय भीम’ चे नारे देत अंगावर पेट्रोल टाकून घेतले.
दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पासून बार्टी कार्यालयासमोर २५ जुलै २०२४ च्या अधिछात्रवृत्ती निर्णयाच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू असून आजचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस होता. दिनांक ०७ ऑगष्ट पासून अधिछात्रवृत्ती कागदपत्रे पडताळणीवर एकमताने बहिष्कार टाकला असून विद्यार्थ्यांनी १०० टक्के अधि छात्रवृत्तीचा निर्णय घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
याच अनुषंगाने आज निर्णय अधिकाऱ्यांसोबत बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी ०४ वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठिय्या केला. याच दरम्यान २०२२ च्या संशोधक विद्यार्थ्याने १०० टक्के अधिछात्रवृत्ती हमारा हक्क है अशी घोषणा देत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जीवंत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मागील अडीच वर्षापासून हा विद्यार्थी अधिछात्रवृत्तीच्या मागणीसाठी लढा देत असून जातीयवादी राज्य शासन अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांची ही मागणी पूर्ण करत नसल्यामुळे या नैराश्यातून त्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समितीला सांगितले. तसेच हा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातला असून आपल्या मित्र परिवाराकडून दीड लाखाचे कर्ज काढून पी एच.डी चे संशोधन कार्य करत असल्याचे सांगितले. अधिछात्रवृत्तीचा मागच्या अडीच वर्षापासून वाट बघण्याचा संयम आता राहिला नसून आत्महत्या करणे हाच एकमेव पर्याय आहे. या सरकारला रोहित वेमुला सारख्या आत्महत्या अपेक्षित असून डोळ्यात पाणी आणून स्तब्धता पाळली.
यावेळेस कृती समितीने सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवासोबत बैठकीची मागणी केली असून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बैठकी संदर्भात निर्णय न आल्यास अनेक विद्यार्थी असाच प्रयत्न करतील असे अधिछात्रवृत्ती विभाग प्रमुख अनिल कारंडे यांना सांगितले आहे. यावेळेस संशोधक विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन घोषणा देत बार्टी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात दररोज दोनशे अडीचशे संशोधक विद्यार्थी सहभागी होत असून विविध संगठनांचे प्रतिनिधी सुध्दा भेटी देत आहेत. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा उपोषण मंडपाला भेट दिली.














