


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड : जनमानसात सर्वधर्मसमभावाचा कॉंग्रेसचा विचार मजबूत आहे. हाच विचार घेवून कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत जावे. पक्ष-संघटना मजबूत करावी, असे आवाहन कॉंग्रेसचे गंगाखेड निरीक्षक प्रा. डॉ. मुंजाजी धोंडगे यांनी केले. गंगाखेड विधानसभा मतदार संघ मित्रपक्षाकडे असल्याने पक्षाची ताकद म्हणावी तशी वाढत नाही. ती वाढावी यासाठी हा मतदार संघ कॉंग्रेसकडे सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड तालुका कॉंग्रेसची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. पक्ष निरिक्षक म्हणून प्रा. डॉ. मुंजाजी धोंडगे ऊपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. संतोष मुंडे हे होते. जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. हनुमंत जाधव, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधी नितीन चौधरी, जिल्हा ऊपाध्यक्ष अमानुल्ला काका, युवक जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर, अ. जा. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, युवक प्रदेश सचिव प्रणित खजे, सिद्धोधन भालेराव, सेवादल तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती.
तालुका कॉंग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी हंसराज जाधव, दत्तराव भिसे, संजय धारे, दरलींग भुसनर व क्रिडा विभाग जिल्हाध्यक्ष वामन ढोबळे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. विविध पदाधिकाऱ्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर आपले म्हणने मांडले. लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. प्रचार यंत्रणेतही सहभागी करून घेतले गेले नाही. याची पुनरावृत्ती विधानसभेला होणार असेल तर वेगळा विचार केला जाईल, असा ईशारा देण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवून हा मतदार संघ कॉंग्रेसकडे सोडवून घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही प्रा. डॉ. धोंडगे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गोविंद यादव यांनी केले. तर आभार सिद्धोधन भालेराव यांनी मानले. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गोपीनाथराव चव्हाण, माजी नगरसेवक राजकुमार सावंत, संतोष समशेटे, मोईन शेख, नागेश डमरे, शिवाजी घोबाळे, सुभाष शिंदे, दादाराव नंदिवाड, दिपक नांदुरे, मोहन खांडेकर, करीमभाई, जगन्नाथराव मुंडे, शेख अज्जू, महावीर घोबाळे, अजय व्हावळे, अज़ीम खान आदिंसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सोनटक्के, मोहन खोले यांनी परिश्रम घेतले.
विधानसभेसाठी यादव, कुंडगीर ईच्छूक
कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी पुर्वतयारी सुरू केली आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघ मित्रपक्षासाठी सुटलेला असला तरी येथून ईच्छूक असलेल्यांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत गंगाखेड तालुक्यातून गोविंद यादव व अभय कुंडगीर यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. ही नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जाणार असल्याचे पक्षनिरीक्षक प्रा. डॉ. धोंडगे यांनी सांगीतले.













