


सर्वांचे मन स्वकर्तृत्वने जिंकणारे, सामाजिक,शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य करण्यासाठी झपाटलेले, साचेबंदपणा व्यक्तिमत्त्वात नसणारे, सरळ मार्गाने जाऊन सतत कार्य करीत राहणारे, 33 वर्षाच्या कार्यकाळात अध्यापनाचे नवनवीन प्रयोग करणारे, विविध उपक्रम व प्रकल्प राबवणारे आणि विविध अध्यापन पद्धतीतून तथा आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेतून आदर्श विद्यार्थी घडविणारे आदर्श शिक्षक,आदर्श अध्यापक प्रबोधन माला,आदर्श पालक प्रबोधन माला, आदर्श काव्य प्रबोधन माला,घडवू या व्यसनमुक्त समाज या कार्यक्रमातून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करणारे,
दारुनं मेला ओ माय – या एकांकिकेतून मद्यपींना व्यसनमुक्त करणारे,विविध कार्यक्रमातून समाजात जनजागृती करणारे
समाजप्रबोधनकर्ते, थोरांचे अभंग व विचार अभंगांचे लेखन करून ते अभंग तरंग या काव्यसंग्रहात प्रकाशित करणारे अभंगकार, कवी, साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा दि. २ ऑगस्ट २०२४ ला असलेल्या त्रेसष्ठी निमित्त त्यांचे मी अभिष्टचिंतन करतो व त्यांच्या अष्टपैलू प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न करतो.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख संस्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती येथे कमवि शिक्षक नंतर पर्यवेक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी ३१वर्षे १९दिवस सेवेत राहून आदर्श विद्यार्थ्यांना घडविले.
इयत्ता अकरावी – बारावीला मराठी विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांची मराठी विषयात अभ्यासाची गोडी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी विविध अध्यापन पद्धतींचा उपयोग केल्यामुळे प्रभावी अध्यापनातून त्यांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात ८५ ते ९५ टक्के गुण प्राप्त झालेले आहेत.
इयत्ता अकरावी मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची मराठी वर्णमालेची व वळणदार हस्ताक्षरांची परीक्षा घेऊन असमाधानकारक उत्तरामुळे दुःखी न होता विद्यार्थ्यांच्या सहमतीने दोन रेषेच्या वहीत मराठी शुद्धलेखन प्रकल्प व वळणदार हस्ताक्षर प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा खचलेला मूळ पाया पक्का करूनच ते मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा दरवर्षी ओनामा करीत. या प्रकल्पांचा फायदा विद्यार्थ्यांना अकरावी – बारावी मध्येच नव्हे तर पुढील शिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असे त्यांचे माजी विद्यार्थी कथन करतात आणि सरांना फोन करून त्यांची यशोगाथा कथन करतात.
विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी शाळेत “आदर्श वाचन प्रकल्प” सुरू केला होता तर ग्रंथालयात ” वाचाल तर वाचाल ” हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली होती.
विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कला निर्माण व्हावी म्हणून सरांनी “आदर्श भाषण प्रकल्प” राबविला.भाषणासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले . वर्षभरातील थोरांच्या जयंती – पुण्यतिथीच्या कार्यक्रमात वक्तृत्व व काव्य स्पर्धेचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तके देऊन त्यांचा गौरव केला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेची आवड निर्माण होऊन विविध संस्था व शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत तालुका जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहेत.
प्रा.बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी ” आदर्श लेखन प्रकल्प ” सुरू केला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कलेची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या विविध विषयावरील लेख व कविता नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रेरणा हस्तलिखितामध्ये दरवर्षी समाविष्ट होत होत्या, याशिवाय सर स्वतः कवी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काव्य लेखनाची आवड निर्माण करीत व अनेक विद्यार्थी काव्य लेखन करीत. त्या विद्यार्थ्यांच्या कविता त्यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित करून विद्यार्थ्यांमध्ये काव्य लेखनाची प्रेरणा निर्माण केली त्यातूनच दरवर्षी २७ डिसेंबरला होणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांचे “वऱ्हाडी विनोदी कवी संमेलन” दरवर्षी यशस्वीरित्या आयोजित करून सूत्रसंचालनातून विद्यार्थ्यांमध्ये काव्य ऊर्जा निर्माण करीत.
विद्यार्थ्यांसाठी “आदर्श निबंध लेखन प्रकल्प” राबवून निबंध लेखनाची कला शिकवून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी आदर्श निबंध लेखनाची गोडी निर्माण केली,त्यासाठी त्यांनी आदर्श निबंध लेखन पुस्तिका तयार केली आहे.
सरांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून ” आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला ” या शैक्षणिक कार्यक्रमाची निर्मिती केली या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांनी सन १९९४ पासून स्वशाळे सोबतच विदर्भातील शेकडो शाळा महाविद्यालयात वऱ्हाडी विनोदी भाषेत केले.या प्रबोधन मालेतून त्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा ? अभ्यासात किती करावा ? नियमित अभ्यासाच्या आदर्श वेळापत्रकाचे महत्व,वाचनाचे प्रकार व महत्त्व, पाठांतराचे महत्त्व,आत्मविश्वासाचे महत्त्व, कॉपीमुक्त परीक्षेचे महत्त्व, आदर्श उत्तरपत्रिका कशी सोडवावी ? प्रावीण्याचे गुपित या आणि अशा ३५ मुद्द्यांचे सादरीकरण “भदयाची माय ” या दोन एकपात्री एकांकिकेसह व ” बारावीची शकुनी ” या नकलेसह शाळा महाविद्यालयात सादर करून हजारो विद्यार्थ्यांना घडविले तेव्हा विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक सुद्धा सरांचा कार्यक्रम बघून मंत्रमुग्ध होत होते.या प्रबोधनमालेतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वृद्धिंगत करून त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्याचा सतत प्रयत्न केला व आज त्यांचे हजारो विद्यार्थी विविध उच्च पदावर विराजमान झालेले आहेत.या शैक्षणिक प्रबोधन मालेतील ज्ञानकण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी सन :२०११ ला ” आदर्श अभ्यासाचे तंत्र ” हे अभ्यास विषयक पुस्तक प्रकाशित केले.त्यांनी या पुस्तकात विद्यार्थी जीवन उज्ज्वल करणाऱ्या अनेक गोष्टींचे जिवंत लेखन असे केले आहे की, अभ्यासाबाबत झोपलेला विद्यार्थी खडबडून जागृत होतो व अभ्यासाला मनापासून सुरुवात करतो .
प्रा.बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ” मराठी विषयाची आदर्श अध्ययन माला ” या कार्यक्रमाची निर्मिती केली त्यामुळे मराठी विषयाच्या निकालाची संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मकही दरवर्षी वृद्धी होत होती .बोर्डाच्या परीक्षेत 75% जे 95% गुणाच्या दरम्यान त्यांचे ८० टक्के विद्यार्थी असत.
एम.ए.( मराठी),बी.एड., एम.फिल.( मराठी) झालेल्या प्रा.अरुण बुंदेले सरांचा जन्म दि. २ ऑगस्ट १९६१ ला अचलपूर जि.अमरावती या ऐतिहासिक नागरी मध्ये झाला. त्यांचे वडील आदर्श नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले आणि आई समाजसेविका कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न विविध प्रबोधन मालेतून ते सन – १९९४ पासून आज सेवानिवृत्ती नंतरही पाच वर्ष झाली तरी सुरूच आहे. यासाठी त्यांनी मातापित्यांच्या नावे कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करून त्याद्वारे ते सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम तसेच थोरांच्या जयंती – पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम राबवतात आणि आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक व कै . बाबारावजी वायलाजी बुंदेले स्मृती पारितोषिक रोख रक्कम, सन्मानपत्र, पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन दरवर्षी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करतात. त्यांनी आई-वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी माता – पित्यांच्या नावे पाच ते दहा हजाराची देणगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांसाठी अनेक शाळेत दिलेली आहे. या रकमेच्या व्याजातून दहावी – बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी त्या त्या शाळेत पारितोषिक देण्यात येते.
” परीक्षेला जाता जाता ” या प्रबोधन मालेचे परीक्षेच्या दोन महिने अगोदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना ज्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयास त्यांनी स्वशाळेसोबतच इतर शाळेतही केलेला आहे. परीक्षेपूर्वी अमरावती आकाशवाणी,90.4 कॉटन सिटी ,अकोला आकाशवाणी व इतर आकाशवाणी केंद्रावर “परीक्षेला जाता जाता” त्या विषयावर सरांच्या परीक्षेपूर्वी मुलाखती सुद्धा प्रसारित झालेल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे हे कार्य सुरूच आहे.
प्रा.बुंदेले स्वतः मराठी विषयाचे अध्यापन आठ अध्यापन पद्धतीद्वारे विविध प्रकल्प व उपक्रम राबवून शिकवित होते. त्यांनी हे आदर्श अध्यापन स्वतः पुरते मर्यादित न ठेवता “आदर्श अध्यापक प्रबोधन माला” या प्रबोधन मालेची निर्मिती करून ते अध्यापकांपर्यंत पोचवितात.
त्यांनी या आदर्श अध्यापक प्रबोधन मालेचे सादरीकरण शैक्षणिक गट संमेलन,डी.एड., बी.एड.कॉलेज आणि विविध शाळेतील शिक्षकांसमोर सादर करून आदर्श अध्यापनाचे तंत्र शिक्षकांपर्यंत पोहोचवले .या प्रबोधन मालेतील विविध मुद्दांचे विवेचन” आदर्श अभ्यासाचे तंत्र” या पुस्तकात आहे,म्हणून त्यांची अकरावी -बारावीचे मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून नियुक्ती झाली होती तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत असे आशय समृद्धी प्रशिक्षणामध्ये सुद्धा त्यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली होती.
अध्यापक विद्यार्थ्यांना आदर्श अध्यापनातून घडवण्याचा प्रयास करतातच पण त्याला पालकाची ही साथ असणे आवश्यक आहे त्यासाठी पालक जागृतीची आवश्यकता आहे.या आवश्यकतेतून त्यांनी ” आदर्श पालक प्रबोधन माले”ची निर्मिती केली. शाळेमध्ये पालक शिक्षक संघाद्वारे घेण्यात येणाऱ्या पालक सभेमध्ये ” आदर्श पालक प्रबोधन मालेचे ” सादरीकरण
स्वशाळेसोबतच इतर शाळांमध्ये घेत असत व पालकांमध्ये पाल्या विषयीची जागृती निर्माण करीत कारण पालक जागृती शिवाय विद्यार्थी घडू शकत नाही असे सरांचे स्पष्ट मत आहे कारण विद्यार्थी हा शाळेत सहा तास आणि अठरा तास घरी असतो म्हणून आई-वडिलांचे मुलांमधील सुसंस्कार आणि अभ्यासाबाबत मुलांची जागृती या सर्व गोष्टींकडे माता पित्यांचे लक्ष असणे आवश्यक आहे.जागृत पालकच मुलांना चांगल्या प्रकारे घडवू शकतात असे समाजामध्ये अनेक उदाहरण आहेत. या दृष्टिकोनातून सरांचा हा पालक प्रबोधन माला कार्यक्रम महत्त्वपूर्ण वाटतो.
सेवानिवृत्तीनंतर त्यांचे प्रबोधन मालेचे कार्यक्रम सुरू असतात पण आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी जे प्रकल्प उपक्रम राबविले तसेच विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब करून प्रभावी अध्यापन केले असे करून दरवर्षी विद्यार्थ्यांना गुणवंत बनवण्याचा प्रयास केला यावरून एका आदर्श शिक्षकाच्या अंगी असलेले जे गुण असायला हवेत ते गुण मला सरांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसले यावरून ते एक आदर्श व अष्टपैलू शिक्षक म्हणून नावारुपास आले असे म्हणता येईल.
“भाऊसाहेबांच्या विचारांचा
परिसासारखा स्पर्श झाल्यामुळे विविध शैक्षणिक प्रबोधनमालेतून भाऊसाहेबांचे आदर्श विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्न त्यांनी केले. “आदर्श अभ्यासाचे तंत्र” या प्रकाशित केलेल्या पुस्तकातून त्यांनी अभ्यासविषयक शैक्षणिक प्रबोधन केले. त्यांच्या या सर्व क्षेत्रातील कार्याचा सन्मान राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कारांनी करण्यात आला .त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याला सेवानिवृत्तीनंतर गती प्राप्त होऊन त्यापुढील त्यांचे जीवन आरोग्यदायी व सुखमय होवो ही सदिच्छा .” असे भावपूर्ण उद्गार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्याविषयी माननीय प्राचार्य श्री केशवराव रामकृष्णराव गावंडे (सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती ) यांनी सरांच्या निरोप व सेवाकार्य गौरव समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये काढले होते. यावरूनच सरांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते .
सरांनी शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक,सांस्कृतिक,
साहित्यिक कार्य केले आहे.सरांच्या सामाजिक, शैक्षणिक विषयावरील कविता लेख व थोर पुरुष आणि संतांवरील अभंग रचना विविध वृत्तपत्र मासिका मध्ये प्रकाशित झालेल्या असून शाळेत थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी नेहमीच स्वरचित काव्यरचना व अभंग रचनांचे गायन केलेले आहे.त्यांच्या व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, निरक्षरता निर्मूलन, दारूबंदी, हागणदारी मुक्त गाव,हुंडा निर्मूलन, स्वच्छ ग्राम,स्वच्छ शाळा, स्वच्छ भारत इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या काव्यरचना व अभंग नागपूर आकाशवाणी,साहित्य संमेलनातील कवी संमेलन स्वनिर्मित आदर्श काव्य प्रबोधन माला या कार्यक्रमांमध्ये अभिनयातून कवितेचे काव्य गायन करून समाजप्रबोधन केलेले आहे.विशेष म्हणजे सन : २०१९ मध्ये यवतमाळ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या
“लेक शिकवा अभियान” या काव्यगीताचे त्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण करून सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.२०२१ ला प्रकाशित झालेल्या “निखारा” या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी या सर्व कविता समाविष्ट केलेल्या आहेत. या सर्व काव्यरचनांचे सादरीकरण सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात व ऑनलाईन कवी संमेलनात सुरू आहे.
पालक जर व्यसनमुक्त असेल तर ते पाल्याला चांगल्या प्रकारे घडवू शकतात म्हणून सरांनी घडवू या व्यसनमुक्त समाज या कार्यक्रमाचे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व शासनाच्या व्यसनमुक्ती सप्ताहामध्ये सादरीकरण करून थोर पुरुषांचे व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला व सेवानिवृत्तीनंतर येथे करीत आहेत.विविध सामाजिक, शैक्षणिक, विषयावरील विचारांचा व थोर पुरुषांच्या विचारांचा भाषणाद्वारे प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे . त्यांचे या विषयावरील विविध लेख ,कविता दैनिक, मासिक, पाक्षिक यामध्ये प्रकाशित करून समाजप्रबोधन समाजजागृती केलेली आहे व वरिष्ठ महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये ग्राम सुधारणा, हागणदारीमुक्त ग्राम,व्यसनमुक्त ग्राम असे अनेक ग्राम समस्यांवर आधारित कविता वऱ्हाडी विनोदी शैलीतून कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.
उपेक्षित समाज महासंघ, वऱ्हाड विकास तर्फे आयोजित समाज भूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी आयोजन केलेल्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील सत्यशोधक परिवर्तनवादी कवी संमेलनामध्ये कवीसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. श्री जयदीप सोनखासकर यांनी आयोजित केलेल्या कारंजा लाड येथील शिक्षक साहित्य संमेलनातील मराठी भाषेच्या परिसंवादात प्रमुख व्याख्याता म्हणून त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनार्थ विषयाला योग्य तो न्याय दिला होता. शेंदुर्जनाघाट येथे संपन्न झालेल्या ग्रामीण दलित साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग होता. पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमात प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून हजर राहून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात मराठी विषयाची गोडी निर्माण केली होती.
प्रा.बुदेले यांचे सामाजिक, शैक्षणिक विषयावरील आजपर्यंत अकरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये आदर्श अभ्यास पुस्तिका, आदर्श अभ्यासाचे तंत्र, आदर्श मार्गदर्शिका व आदर्श आदर्श निबंध लेखन पुस्तिका ही शैक्षणिक विषयावरील पुस्तके तर भद्यांच लगीन, शकुने आता आपलं कसं ?, दारूनं मेला व माय,नळावरची झोंबाझोंबी, हुंडा पापाचा हंडा या सामाजिक एकांकिका प्रकाशित झालेल्या आहेत.या एकांकिकांचे प्रयोग शाळा महाविद्यालय तसेच समाज कल्याण द्वारे घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेमध्ये झालेले आहे. त्यामध्ये प्रथम,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस त्यांच्या एकांकिकांना मिळालेले आहेत. तसेच निखारा व अभंग तरंग हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या अकरापैकी बहुतेक पुस्तके हे पारितोषिक प्राप्त आहेत.
आजपर्यंत सरांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांच्या समीक्षा, विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, थोरांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन कार्य व तत्वज्ञानावरील लेख तसेच विविध मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वावरील त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले चरित्रात्मक लेख यावर आधारित ” वैचारिक लेखसंग्रह ” आणि ” पत्रातून विद्यार्थी प्रबोधन ” ही त्यांची दोन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
बहुआयामी,अष्टपैलू , आदर्श व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रा.अरुण बुंदेले सरांना हे सर्व कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो,अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सुखी व आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा .
आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार
प्राप्त
माजी प्राचार्य
प्रा.जयंत शां.रायबोर्डे
बुलढाणा .














