Home महाराष्ट्र श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठिंब्यामुळे जरांगे पाटील यांच्या लढ्याला यशः...

श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठिंब्यामुळे जरांगे पाटील यांच्या लढ्याला यशः सौ स्नेहल राजेशिर्के नक्षत्रच्या प्रांगणात आरक्षणाचा आनंदोत्सव

425

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड /सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी आंदोलन म्हणून मराठा क्रांती मोर्चाची नोंद झालेली आहे. आंदोलनाचे शिल्पकार श्री मनोज जरांगे पाटील व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेला पाठपुरावा व त्यांना मराठा समाजाने दिलेली साथ यामुळे सरकारने आज मराठ्यांना आरक्षण दिले. या घटनेचा मराठ्यांची राजधानी असणाऱ्या साताऱ्याला आणि आम्हा महिलांना खूप आनंद झाला आहे, अशी भावना सातारच्या माजी नगरसेविका सौ स्नेहल सुहास राजे शिर्के यांनी व्यक्त केली.

नक्षत्रच्या प्रांगणात आज महिलांनी आरक्षणाचा निर्णय सकारात्मक झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी स्नेहल राजेशिर्के बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या आता खऱ्या अर्थाने रामराज्य येणार असून त्याची आरक्षणाच्या निर्णयाने सुरुवात झाली आहे. कोणतेही आंदोलन हे टिकवण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. परंतु दुर्दैवाने आज त्याच मावळ्यांमधील मराठा समाज शासकीय सवलती पासून वंचित होता. आता पुन्हा एकदा त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्य सरकारने संधी उपलब्ध केलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांना तसेच आरक्षणासाठी जे हुतात्मे झाले त्यांना आजच्या लढ्याचे श्रेय द्यावे लागेल. आज मराठा समाज आनंदात आहे. कारण कोणतेही आंदोलन करायचं म्हटलं की पूर्वीसारखे आता लोक सामील होत नाहीत. परंतु मराठा समाजासोबत इतर समाजाने सुद्धा खूप मोठे योगदान दिले आहे. विशेषतः मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, मुस्लिम समाजानेही खारीचा वाटा उचललेला आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व मराठा योद्धा श्री मनोज जारंगे पाटील यांचे आभार खरेतर तमाम मराठा समाजाने मानायला हवेत, असे स्नेहल राजे शिर्के यांनी सांगितले.

ओबीसी समाजाच्या महिला नेत्या माजी नगरसेविका सौ स्मिता घोडके यांनी सांगितले की मी इतर मागासवर्गीय जातीची महिला असून छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी मला संधी दिली. त्यामुळे मी या सातारा नगरपरिषदेमध्ये विकास कामे करू शकले आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला राज्य सरकारने न्याय दिलेला असून याचा मनस्वी आनंद वाटत आहे. आम्ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करत असल्याने आमच्या सोबत सर्वजण असावे. कुणी मागे राहू नये ही आमची मनोभावे धारणा आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व सौ श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळतच आहे. परंतु राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी कायम आहेत. आज मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण देण्याची घेतलेली भूमिका ही ऐतिहासिक असून न्यायालयाने याचा गांभीर्याने विचार करावा. शेवटी न्यायासाठी माणूस नसून माणसांसाठी न्याय हे पुन्हा अधोरेखित होणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. तसेच महात्मा फुले, शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांनी महिलांना अधिकार मिळवून दिलाय. आता आरक्षणामुळे मराठा समाजाच्या माता-भगिनींनाही लाभ मिळणार आहे. याचा आम्हाला मनापासून आनंद वाटत असल्याचेही इतर महिलांनी सांगितले. नक्षत्रच्या प्रांगणात आज आरक्षणामुळे आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी सर्व जाती धर्मातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here