Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक विम्याची मदत व्याजासह जमा करा ! मोर्शी तालुक्यातील...

शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक विम्याची मदत व्याजासह जमा करा ! मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत !

337

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्या ऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्या ऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच शासनाकडून होतांना दिसत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. ४ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना देखील मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यावधी रुपये रिलायन्स इन्शुरन्स कंपनी वाटप करण्यास दिरंगाई केल्या जात असल्यामुळे शासनाची फळ पीक विमा योजना ही संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या फायद्याची नसून विमा कंपनीच्या फायद्याची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२२ – २३ अंतर्गत अंबिया बहारामध्ये मोर्शी तालुक्यातील ७ महसूल मंडळातील ९९२ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी १० लक्ष १४ हजार ८०० रुपये भरून ९७१.०९ हेक्टर क्षेत्राचा फळपिक विमा काढला होता. मात्र फळ पीक विम्याचा ४ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत मोर्शी तालुक्यातील ९९२ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित आल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ३ कोटी ५१ लक्ष ४२ हजार २०० रुपये मंजूर असलेल्या विम्याची मदत ८ दिवसात संपूर्ण व्याजासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास मोर्शी तहसील कार्यालयासमोर हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, कृषी धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मोर्शी तालुक्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड ३० हजार हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता मोर्शी तालुक्यातील ९९२ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा त्यांना विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची मागणी असून त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीकडून मोर्शी तालुक्यातील ९९२ पात्र विमाधारक शेतकऱ्यांना ३ कोटी ५१ लक्ष ४२ हजार २०० रुपये मदत संपुर्ण व्याजासह तत्काळ पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्शी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाला दिला असून मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here