


🔹आ.डॉ.गुट्टेंचा कानमंत्र : प्रशिक्षण शिबीर संपन्न
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.11ऑगस्ट):-भारतीय लोकशाहीला उज्ज्वल परंपरा आहे. त्यामध्ये कार्यकर्ता आणि नेता यांच्यात नेहमी स्नेह, आदर व आपुलकीचे नाते असते. ते दोघेही जीवाभावाचे सोबती असतात. मात्र, बदलत्या काळात कार्यकर्ता हायटेक होत आहे. पण, लक्षात ठेवा की, कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांकडून जशा अपेक्षा असतात. अगदी तशाच अपेक्षा नेत्यालाही कार्यकर्त्यांकडून असतात, असा कानमंत्र गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख संकल्पनेतून शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पदधिकारी व कार्यकर्ता एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून आ.डॉ.गुट्टे यांच्या कामांचा आलेख व आढावा तसेच विस्तृत माहिती देणाऱ्या जनसेवक या संगणकीय डिजीटल ॲपचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याची संपूर्ण माहिती तंत्रज्ञान अभ्यासक निनाद सुमंत यांनी दिली.
कोणतीही निवडणूक जिंकण्याचा निर्धार करून लढवा. त्यासाठी आपल्यात एकी असणे गरजेचे आहे. म्हणून आपापसातले मतभेद दूर करा. बसून ऐकमेकांशी बोला. कारण, त्यातून आपुलकी आणि स्नेह वृद्धिंगत होईल. मी मुरब्बी राजकारणी नाही. त्यामुळे माझ्या पोटात तेच ओठात असते. मी पाडापाडीचे राजकारण कधीही करीत नाही. कारण, मी मनमोकळा माणूस आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.
तत्पूर्वी, प्रास्ताविकात मुख्य आयोजक सुनील भैय्या गुट्टे म्हणाले की, तंत्रज्ञानाची माहिती असलेला कार्यकर्ता तयार केला पाहिजे, हा साहेबांचा आग्रह होता. त्यामुळे प्रशिक्षण शिबीर होत आहे. वर्तमान काळात केवळ घोषणा देणारा नव्हे तर सोशल मिडीयाचा वापर करून घराघरात कामे पोहोचविणारा कार्यकर्ता घडला पाहिजे, यासाठी हा अट्टाहास केला आहे. कोणत्याही कार्यकर्त्यास सोशल मिडियाचा अभ्यास, विविध योजना, कागदपत्रे, अर्ज व निवेदन लेखन करता आले पाहिजे.
याप्रसंगी मार्गदर्शनात प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख म्हणाले की, कार्यकर्ता प्रशिक्षित असणे हे बाब फारच दुर्मिळ झाली आहे. दररोज नवे तंत्रज्ञान विकसित होत असल्याने काळाची पावले ओळखून अशी शिबीरे झाली पाहिजेत. प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. त्यामुळे सकारात्मक सुसंवाद करा. अधिकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आपल्यातला चांगुलपणा जपा. संकुचित वृत्ती सोडून द्या. माणसाला माणुसकीची वागणूक द्या.
पुढे सोशल मिडीया अभ्यासक नयन गुरव म्हणाले की, केवळ लोकप्रतिनिधी निवडणे हा मतदारांचा अधिकार नव्हे तर आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांचा आढावा घेणे सुध्दा आपले मतदार म्हणून काम आहे. तसेच नेत्याची कामे जनमानसात पोहोचविणे पदधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. म्हणून दररोज केवळ दहा मिनिटे वेळ काढून साहेबांचे सोशल मिडीया प्लेटफॉर्म पाहा. लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्यातून तुम्हाला विकासाची वाटचाल सहज समजेल.
इतिहासात छ.शिवाजी महाराजांची मावळ्यांवर जशी भिस्त होती, तशीच भिस्त नेत्याची कार्यकर्त्यांवर असते. त्यामुळे त्यांच्यात वेगळे नाते तयार होते. सध्या लोकशाहीतला महत्त्वाचा घटक म्हणजे कार्यकर्ता आहे. म्हणून वेळेचे नियोजन करा. संवाद कौशल्य वाढवा. सकारात्मक विचार बाळगा, असा सल्ला प्रसिद्ध वक्ते प्रा.विजय नवले यांनी दिला.
यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, मुख्य आयोजक युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, महेश बडे, श्रीराम सातपुते, अनिरुद्ध शिंगाडे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष, आ.डॉ.रत्नाकर (काका) गुट्टे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*त्यांची स्पीड मलाही मॅच होत नाही – सुनील भैय्या गुट्टे*
विद्यमान आ.डॉ.गुट्टे साहेब हे सातत्याने कामात व्यस्त असतात. त्यांचा दिनक्रम अगदी पहाटे सुरू होतो. आज इथे तर उद्या कुठे असतील सांगता येत नाही. पायाला भिंगरी लावून ते फिरतात. त्यामुळे वडील म्हणून मला त्यांचा आदर आहे. मात्र, त्यांच्या स्पीड मला कधीच मॅच झाला नाही. कारण, त्यांचा आत्मविश्वास व ऊर्जा सकारात्मक आहे. म्हणून त्यांची स्पीड पकडण्याचा आपण प्रयत्न करूयात, असे म्हणत सुनील भैय्या गुट्टे यांनी आपल्या वडीलांवर स्तुतीसुमने उधळली.














