


✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.1मार्च):-हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डेहणे ता.खेड जि.पुणे येथे मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांची जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वि. वा. शिरवाडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.जयराम खाडे होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे (कवी-वादळकार) ,प्रा. दिलीप गोरे, उपप्राचार्य प्रा. सिलदार पावरा, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. निखिल सरजिने इ.मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा.राजेंद्र सोनवणे म्हणाले की, “मराठी भाषेच्या समृध्दीसाठी आणि विकासासाठी सर्व स्तरातुन प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.मराठी भाषेचा स्वाभिमान, अभिमान रुजविण्यासाठी सर्व स्तरांवर अभ्यासक्रमात, व्यवहारात आणि रोजच्या वापरात प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.आत्म्याचा आविष्कार करण्यासाठी मातृभाषा ही प्रभावी ठरत असते.व्यक्त होण्यासाठी आपण मराठी भाषेचा वापर केला पाहीजे. वाचन संस्कृती रुजविल्यास आणि संशोधनवृत्तीतूनच हा मराठी भाषा गौरव दिन साजरा व्हावा. कुसुमाग्रजानी मराठी भाषेला आपल्या साहित्यातुन समृध्द केलेले आहे. हा वारसा आपण जपला पाहीजे. काव्य, साहित्याने माणसांचे आयुष्य निर्भिड आणि समृध्द होत असते. युवकांना मराठी भाषेचे वैभव जवळून दाखविण्याची वेळ आलेली आहे. हे विसरता येणार नाही. मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. ती परंपरा आजच्या पिढीने जपली पाहीजे.”
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.जयराम खाडे म्हणाले,”मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यातुन आपल्याला मायमराठीची गोडी लागून तिची समृध्दता लक्षात येते. कुसुमाग्रज या महान कवीने मराठीतील नाटक, कविता, कांदबरी, ललित, कथा सर्व प्रकारच्या सर्व वाड्:मय प्रकाराला वैभवाच्या शिखरावर नेहून ठेवले आहे. त्याच्या जयंतीनिमित्त हा दिन सर्वञ साजरा केला जात आहे. महाविद्यालयीन जीवनात अशा उपक्रमातुन नवीन प्रेरणा मिळत असते.”
यावेळी कवी वादळकार, पुणे यांच्या बहारदार कवितांनी काॅलेज वर्ग आनंदी झाला. प्रा. दिलीप गोरे यांची शेरोशायरी व कविता सादरीकरण झाले.
*मराठी भाषा दिन*
*हा अभिमानाचा,*
*जय जयकार करु*
*मातृभाषेचा*
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष शिंदे, पाहुणे ओळख प्रा. भरत शेंगाळ यांनी करुन दिली. बहारदार सूञसंचालन प्रा.महेश रानवडे तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन काळे यांनी केले.













