Home Breaking News अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड-11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड-11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

242

▪️11,63,460 किमतीचा मुद्देमाल जप्त

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.10जून):-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज (दि.10) हॉटेल बजेट, जुनोना चौक, बाबूपेठ येथे सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान व खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान एकूण 11 ग्राहक आशिष मधुकर भसारकर, संपत कोमरय्या कडम, रमेश नरसय्या भंडारी, रवि मलय्या पत्तीवार, रामलू रायमलू भंडारी, उमेश विठ्ठलराव गाडगे, राजू नानाजी साळवे, विठ्ठल आबाजी निब्रड, विक्की रमेश मडावी, प्रभाकर नथ्थू कोवे, मुकेशकुमार रामलाल गुप्ता हे प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच चुन्नू विजयपालसिंग परमार (मॅनेजर) हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 11 ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

अवैध मद्यपान अड्ड्याचा संचालक / होटेल मालक आशिष चांदेकर हा कारवाईदरम्यान फरार झाला असून त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यास अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याच्याविरुद्ध पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जप्त केलेला मुद्देमाल : या कारवाईत 23020 रुपये किमतीची दारु व काऊंटरवर असलेली 13040 रुपये रोख रक्कम कारवाईवेळी जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त दोन कूलर्स, गोदरेज ब्ल्यू स्टार, व्होल्टास कंपनीचा डीप फ्रीजर, रेफ्रिजरेटर, गॅस शेगडी, गॅस सिलिंडर, वॉटर फिल्टर, स्टील टी-टेबल, फायबर खुर्चा, वॉटर कॅन, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी विविध भांडी व इतर साहित्य यांची एकूण किंमत 1 लक्ष 27 हजार 400 रुपये असून, रोख रक्कम व मद्यसाठ्यासह एकूण 11 लक्ष 63 हजार 460 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जनतेस आवाहन : नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारू, अवैध मद्यपान अड्डे किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्याची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक दत्तात्रय वरठी, प्रभारी निरिक्षक विशाल कोल्हे, दुय्यम निरिक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे, सहायक दुय्यम निरिक्षक राहुल अत्रे, जवान प्रशांत घोडमारे, रामचंद्र अम्मावार, किशोर पेदुजवार, गोकुल पवार, अमोल भोयर, संजयकुमार हरिनखेडे, वाहनचालक जगन पुट्टलवार यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here