Home महाराष्ट्र जनगणने मध्ये धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ का लिहावे?

जनगणने मध्ये धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ का लिहावे?

29

बौध्द समाजातील समस्त बंधू-भगिनींना विनम्रपणे एक सुचना करु इच्छितो की, आजच्या 2026-27 या दोन वर्षा मध्ये आपल्या घरोघरी जनगणना करण्यासाठी लोक येणार आहेत. तेव्हा त्यांना माहिती देत असताना सन्माननीय भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध’ आणि जातीच्या रकान्यात ‘महार’ ह्या दोन बाबी लक्षपूर्वक लिहून दिल्या पाहिजेत! त्या अनुषंगाने आपण त्या आदेशाचे अनुपालन करावे त्याच प्रमाणे आपण जी बुद्ध वंदना घेतो ती पाली भाषेत घेत असल्यामुळे आपणास मराठी, हिंदी व इंग्रजी आणि खास करून पालीभाषा सुद्धा अवगत आहे.

याचे आपण त्या लोकांना स्पष्टीकरण दिले पाहिजे! असे आदेशित करण्याचे कारण की, भारतीय समाजात आजही जाती व्यवस्था कायम आहे, ती जिवंत आहे त्यामुळे आपण पूर्वीचे महार आणि धार्मिक दृष्ट्या धर्मांतर केल्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे.परंतु आपण पूर्वाश्रमीच्या जाती व्यवस्थेनुसार महार होतो. आणि त्याच अवस्थेत आपण बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून धर्माने आपण बौध्द असून जातिव्यवस्थेतुन आपले जात्यांतर झाले नाही असा त्याचा अर्थ होतो. तसेच आपल्या शाळेच्या दाखल्यावर आजही आपली जात लिहून येते. त्यामुळे तीच पूर्वा श्रमीची जात लिहावी लागते. अशा परिस्थितीत सांगायचे झाल्यास आपण आपणास जाच करणाऱ्या त्या हिंदू धर्माला सोडचिठ्ठी दिली आहे खरी आणि बौद्ध धम्माचा अंगीकार केलेला आहे खरा. परंतु सध्याच्या परिस्थितीत हा विषय सामान्य लोकांना समजण्यासाठी फार मोठा किचकट झालेला आहे त्यात अनेक अतीविद्वान लोक सामान्य जणांची दिशाभूल करीत आहेत. वस्तुतः कायद्याचा अभ्यास करून जर ही बाब प्रस्तुत करण्यात आली तर समाजाचा फार मोठा फायदा होईल!

    अन्यथा आपल्या सामाजिक स्थितीवर जो नियोजन आयोग विकासात्मक दृष्टीने आपल्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी त्याचप्रमाणे अन्न वस्त्र आणि निवाऱ्या सारख्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी ज्या निधीची वेगळी तरतूद करीत असते त्यात मोठी बाधा येऊ शकते. त्यासाठी आपली लोकसंख्या किती? आपला धर्म कोणता? आपली हिंदू समाज व्यवस्थेनुसार पूर्वाश्रमिची जात कोणती? यावर अवलंबून असते म्हणूनच आपण या देशातील जातीव्यवस्थेनुसार पूर्वीचे महार आणि सध्या धर्मांतरित बौद्ध आहोत म्हणून अशा प्रकारची नोंद करणे गरजेचे आहे. हा लेख मी माझ्या अल्पशा अभ्यासा अंती निष्कर्ष काढून आपल्यासमोर सादर केला आहे. तसा मी काही कायद्याचा अभ्यासक नाही ना मोठा काही विद्वान. परंतु जेवढे मला ज्ञात झाले तेवढेच प्रस्तुत करीत आहो. याची नोंद घ्यावी!

    बांधवांनो आपल्या आजच्या या देशाचे वैशिष्ट्यही असे आहे की, इथली सारी गणिते ही जातीय समीकरणावरून ठरविल्या जातात त्यामुळे बौद्धांनी पूर्वाश्रमीची जात लिहिणे गरजेचे आहे परंतु बौद्ध ही जात नसून तो फक्त नैतिक दृष्ट्या व्यवहारिक कर्म सांगणारा विचार आहे. अर्थातच यालाच धम्म म्हणतात आणि बौद्ध धम्मात जाती व्यवस्था नसल्यामुळे आपणास जातीच्या रकान्यात बौद्ध हा शब्द कदाचितही टाकता येत नाही. अशा प्रकारे अतिक्लीस्ट विषयाला आपण सामोरे जात असताना आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे खूप मोठे विद्वान आणि संविधानिक बाबींचे गाढे अभ्यासक आहेत. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. त्यामुळे आपणास चिंता करण्याची गरज नाही. आपला कायद्याचा अभ्यास अजिबात नाही.

त्यामुळे हा विषय आपल्यातील एखाद्या निष्नांत वकीलाने हाताळून जर त्याचे आपल्या अनेकांच्या बुद्धीला पटण्यासारखे स्पष्टीकरण सादर केले असते तर त्यावर विचार करायला हरकत नसती, मात्र तसे काही नाही तर नुसते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांवर व्यक्तिगत हेव्या दाव्यापोटी कुणी आग पाखड करत असेल कींवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणी वाटेल ते काहीही बरळत असेल तर त्याला कवडीची किंमत देऊ नये! हे तमाम सुजाण नागरिकांनी समजून घ्यावे आणि दीड दमडीत विकल्या जाऊन बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्यावर इथून तिथून सर्वच्या सर्व रक्ताच्या वारसांवर टीका टिप्पणी कोणी करावी. हे काही माझ्या बुद्धीला पटण्यासारखे नाही. आणि तमाम आंबेडकरी समाजाला सुद्धा हा वायफळ उद्योग करणारा व्यक्ती मान्यच असणार नाही अशी मला आशा आहे, म्हणून आंबेडकरी जनतेने असे अनाप शनाप वक्तव्य करणाऱ्यांचा हिशोब टिशोब लवकर केला पाहिजे! एवढेच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो.

✒️जीवन बोदडे(भांबेरी,जिल्हा अकोला)मो:-8888757703

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here