Home अमरावती परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन म्हणजे विषमतेविरुद्ध लढणारी एक वैचारिक चळवळ

परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन म्हणजे विषमतेविरुद्ध लढणारी एक वैचारिक चळवळ

27

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, अमरावती येथे १७ मे ला रविवारी संपन्न होत असलेल्या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व परिवर्तनवादी साहित्यिकांना आणि रसिकांना क्रांतिकारी जयभीम ॥

          सन १९६० नंतरचा काळ हा मराठी साहित्यात क्रांतीचा काळ मानला जातो. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवनच क्रांतिकारी विचार व कार्यांनी घडले होते.बाबासाहेबांच्या या क्रांतिकारी विचारातून व कार्यातून प्रेरणा घेऊन जे साहित्य निर्माण झाले, त्याला आपण ‘दलित साहित्य’, ‘आंबेडकरी साहित्य’ किंवा ‘विद्रोही साहित्य’ म्हणून ओळखतो. या साहित्य चळवळीने मराठी साहित्याला वास्तववादाची आणि विद्रोहाची एक नवी दिशा दिली.​अनेक दलित साहित्यिकांनी दलित साहित्याचा पाया रचला आणि बाबासाहेबांच्या चळवळीला साहित्यातून वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.​उदा.बाबुराव बागुल,​अण्णा भाऊ साठे जरी ते लोकशाहीर असले, तरी त्यांच्या साहित्यातील विद्रोह आणि उपेक्षितांचे जगणे हे दलित जाणिवांचे महत्त्वाचे अंग आहे,​नामदेव ढसाळ हे ‘दलित पँथर’चे संस्थापक आणि त्यांच्या ​विद्रोही कवितेने प्रस्थापित साहित्याला मोठे आव्हान दिले.​ज. वि. पवार ,​अर्जुन डांगळे,​दया पवार,​वामन निंबाळकर, ​यशवंत मनोहर, प्रल्हाद चेंदवणकर,

      ​१९६० नंतरच्या दलित साहित्यात ‘आत्मचरित्र’ हा सर्वात प्रभावी प्रकार ठरला.

उदा.​लक्ष्मण माने(उपरा),

​लक्ष्मण गायकवाड (उचल्या),

​शरणकुमार लिंबाळे (अक्करमाशी.),​दया पवार (बलुतं),​बेबी कांबळे(जीणं आमचं),​शांताबाई कांबळे (माझ्या जल्माची चित्तरकथा.),

​ विचारवंत आणि समीक्षक

​ज्यांनी या साहित्याला दिशा दिली आणि विद्रोही साहित्याची तात्विक मांडणी केली असे

​डॉ. गंगाधर पानतावणे ‘अस्मितादर्श’ या मासिकाद्वारे त्यांनी ही चळवळ जोपासली.,

​रा. ग. जाधव: (समीक्षक.)​दत्ता भगत (नाट्यलेखक)​तसेच ​प्रज्ञा दया पवार,​लोकनाथ यशवंत,​उर्मिला पवार,​अविनाश डोळस (कथाकार).

      ​अशा या १९६० नंतरच्या या दलित – आंबेडकरी साहित्याने केवळ अन्यायाला वाचा फोडली नाही, तर मराठी भाषेला ‘प्रस्थापित’ चौकटीबाहेर काढून तिला लोकभाषेचा, वस्तीचा आणि विद्रोहाचा सुगंध दिला.

     आजच्या काळात समाजात वाढणारी विषमता आणि धार्मिक ध्रुवीकरण पाहता विश्वरात्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या मूल्यांचा पुनरुच्चार करणे गरजेचे आहे.परिवर्तनवादी साहित्य केवळ रंजन करत नाही,तर ते मानवी मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी एक वैचारिक विचारमंच उपलब्ध करून देते,म्हणूनच परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे.आंबेडकरी साहित्य संमेलनामुळे उपेक्षितांच्या आवाजाला एक संधी प्राप्त होते.​मुख्य प्रवाहातील साहित्यात अजूनही ग्रामीण, दलित,कष्टकरी आणि शोषित घटकांच्या व्यथांना म्हणावे तसे स्थान मिळत नाही.आंबेडकरी साहित्य संमेलने या उपेक्षित समाजघटकांना त्यांचे अनुभव आणि स्वतःचे प्रश्न जगासमोर मांडण्यासाठी हक्काची जागा देतात.अशा संमेलनातून संवैधानिक जाणीव जागृती निर्माण होते.​भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत संविधानाचे संरक्षण करणे आणि त्यातील तरतुदी सामान्यांपर्यंत पोहोचविणे, यासाठी साहित्यासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.अशा संमेलनातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे होतो आणि तो झालाच पाहिजे.

​नवोदित लेखकांसाठी अशी साहित्यसंमेलने प्रेरणास्थानी असतात.​आंबेडकरी चळवळीतून आणि आंबेडकरी साहित्य संमेलनातून मोठ्या प्रमाणावर तरुण लेखक,कवी आणि विचारवंत पुढे येत आहेत.त्यांच्या लेखणीला दिशा देण्यासाठी,ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही संमेलने एक प्रकारची ‘वैचारिक प्रबोधन शाळा’ म्हणून काम करतात.

     आंबेडकरी साहित्यातील ‘विद्रोही’ परंपरेचे जतन मोठ्या प्रमाणात या साहित्य संमेलनातून होत असते.

​मराठी साहित्यात प्रस्थापित चौकटींना छेद देणारी एक मोठी विद्रोही परंपरा आहे. आंबेडकरी लेखकांनी आंबेडकरी साहित्याला जी धार दिली, ती धार टिकवून ठेवण्यासाठी आणि वर्तमानातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता आहे. संस्कृती आणि इतिहासाचे पुनर्लेखन अशा साहित्य संमेलनामुळे होत असते .

​बहुजन समाजाचा इतिहास आणि संस्कृती अनेकदा विकृत स्वरूपात मांडली गेली आहे. सत्यशोधक आणि आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात आपल्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून ते समाजासमोर मांडणे, हे या संमेलनांचे मुख्य उद्दिष्ट आहे.केवळ ग्रंथोत्सव म्हणून नव्हे, तर समाजाच्या विवेकबुद्धीला जागृत ठेवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी ‘परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन’ ही काळाची गरज आहे,असे मला वाटते.

        परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाची विद्रोही आणि न्याय्य भूमिका असते .

ते प्रस्थापित पारंपरिक साहित्याला पर्याय म्हणून उभे राहिले आहे. यात केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून सामाजिक विषमतेविरुद्धचा तीव्र विद्रोह आणि न्यायाची मागणी असते;कारण विद्रोही साहित्याचा जन्मच वेदनेतून झालेला आहे.केंद्रस्थानी आंबेडकरी विचारधारा हे आंबेडकरी साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे ब्रीदवाक्य या आंबेडकरी साहित्य संमेलनाचा पाया असतो. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या मूल्यांचा प्रचार करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.दलित, कष्टकरी, आदिवासी आणि स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या आंबेडकरी विचारमंचावरून केले जाते. हे साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र मानले जाते.वास्तववादी साहित्यावर भर देणे हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. कल्पनाविश्वात रमण्यापेक्षा समाजातील दाहक वास्तव, जातीयता आणि गरिबीचे चित्रण करणाऱ्या साहित्याला येथे प्राधान्य दिले जाते.हे साहित्य संमेलन सर्वसामान्यांचे असल्याने यात दुर्बोध शब्दांऐवजी लोकभाषा, बोलीभाषा आणि वंचितांच्या भाषेचा प्रभावी वापर केला जातो.कवीसंमेलनांसोबतच परिसंवाद,आंबेडकरी जलसे, शाहिरी,चर्चासत्रे आणि लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यावर विशेष भर या संमेलनात दिला जातो. प्रस्थापित साहित्य विश्वाला या आंबेडकरी विचारमंचावरून आव्हान केले जाते.मराठी साहित्यातील उच्चवर्णीय मक्तेदारी मोडीत काढत, उपेक्षितांच्या साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणे हे या संमेलनाचे मोठे यश आहे.

​ जागतिक मानवतावादाचा पुरस्कार या संमेलनातून केला जातो.आंबेडकरी साहित्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते जागतिक मानवी मूल्यांशी जोडलेले आहे, असे या संमेलनातून सातत्याने मांडले जाते.संमेलनात होणाऱ्या परिसंवाद व चर्चासत्रांमधून सद्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर चिकित्सक भाष्य केले जाते.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुण लेखकांना व कवींना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी हे संमेलन हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देते.

​ परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन म्हणजे केवळ साहित्याचा सोहळा नसून ती विषमतेविरुद्ध लढणारी एक वैचारिक चळवळ आहे. ती माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्याची प्रेरणा देते. या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या समितीतील सर्वांनाच मी धन्यवाद देतो व अभिनंदन करतो.या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व आंबेडकरी साहित्यिकांना, श्रोत्यांना आणि आयोजकांना क्रांतिकारी जयभीम. 

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here