Home चंद्रपूर जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याने संतप्त ओबीसी समाजाचा सरकार विरोधात एल्गार- 15 मे...

जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याने संतप्त ओबीसी समाजाचा सरकार विरोधात एल्गार- 15 मे रोजी करणार थाळी बजाओ आंदोलन

45

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.12मे):-देशभरात सुरू झालेल्या जनगणना 2026 प्रक्रियेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश न केल्यामुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सकल ओबीसी समाज व ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर यांच्या वतीने शासनाच्या भूमिकेविरोधात मंगळवार, दिनांक 12 मे 2026 रोजी पोस्टाद्वारे निवेदन पाठवून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या, सामाजिक व शैक्षणिक स्थिती देशासमोर यावी यासाठी जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असणे अत्यावश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत समाजबांधवांनी संताप व्यक्त केला.

यापूर्वी 10 मे रोजी चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे सकल ओबीसी समाजाची तातडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्यानुसार 12 मे रोजी शासनाला पोस्टाद्वारे पत्र पाठवून ओबीसी समाजाचा असंतोष व्यक्त करण्यात आला.

ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल डहाके यांनी सांगितले की, “ज्यांची जेवढी संख्या त्यांचा तेवढा वाटा हे लोकशाहीचे सूत्र आहे.जोपर्यंत ओबीसींची अचूक आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसींना शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आरक्षण व सवलतीचे नियोजन करणे अशक्य आहे.ओबीसींना इतर या वर्गात समाविष्ट करणे म्हणजे ओबीसींची ओळख पुसणे होय.सरकारने तातडीने स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”असे प्रतिपादन केले.

या आंदोलनात विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जनजागृती अभियान, निवेदन, मोर्चे तसेच पुढील काळात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दिनांक 15मे 2026 रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर धरणे देऊन थाळी बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे जिल्हा महासचिव ॲड. विलास माथनकर यांनी केले.

यावेळी डॉ . अनिल डहाके, ॲड.विलास माथनकर, नंदू नागरकर, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधर मालेकर, विजयराव टोंगे, राजू बनकर, आनंद बावणे, उमाकांत धांडे, डी. के. आरिकर, भाविक येरगुडे, अक्षय येरगुडे, सुनील चवले, सुरेश विधाते, बाबा जीवतोडे, वसंत वडसकर, रवींद्र वनशिंगे, भास्कर सपाट, सुधाकर काकडे, देरकर, भाऊराव झाडे, गुलाब जीवतोडे, खुशाल काळे, वसंत बल्की, परशुराम ठोंबरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here