Home चंद्रपूर ग्रामीण भागातून उभारी घेतलेली यशोगाथा: डॉ. प्राची जिवतोडे हिचा सत्कार

ग्रामीण भागातून उभारी घेतलेली यशोगाथा: डॉ. प्राची जिवतोडे हिचा सत्कार

85

▪️शिक्षणाच्या बळावर ग्रामीण तरुणाईला नवी दिशा

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.6एप्रिल):-देशपांडे वाडी येथे श्री गणेश मंदिर व श्री हनुमान मंदिर परिसरात २ एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या हनुमान जयंती उत्सवाने केवळ धार्मिक वातावरणाची उंची गाठली नाही, तर शिक्षण आणि गुणवत्तेचा सन्मान करणारा सामाजिक संदेशही दिला. या उत्सवाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील दंतवैद्यक पदवी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या कु. प्राची विजयराव जिवतोडे (मूळ गाव गोवरी) हिचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

माजी आमदार श्री सुदर्शन निमकर यांच्या हस्ते डॉ. प्राची तसेच तिच्या मातापित्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाविषयीची जाणीव आणि प्रेरणा दृढ करण्याचे काम केले. शिक्षणाच्या जोरावर सामाजिक परिवर्तन साधता येते, याची ठोस जाणीव या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, प्रा. दौलत भोंगळे, निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक उराडे, बळीराम खुजे, केवाराम डांगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशपांडे वाडीतील नागरिकांनी हनुमान उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने हजेरी लावत या गौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केवळ पूजा-अर्चेपुरते मर्यादित न राहता, समाजातील गुणवंतांचा सन्मान करून सकारात्मक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला. ग्रामीण भागातील तरुणाईसाठी हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, शिक्षणाच्या माध्यमातून उन्नतीचा मार्ग खुला असल्याचा ठोस संदेश देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here