


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१७मार्च):-ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे दि. १७ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी “Woman Empowerment and Self Care” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रितू दमाहे गिरसावळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित धोटे होते. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख तसेच प्राध्यापिका वृंदही उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
मार्गदर्शन करताना डॉ. रितू दमाहे गिरसावळे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रजनन संस्थेची रचना, किशोरवयीन अवस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीविषयी समज-गैरसमज, तसेच कपडे व दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यासोबतच HPV vaccination ची गरज अधोरेखित केली. तसेच सध्या वाढत असलेल्या कॅन्सरच्या प्रमाणाबाबत जागरूकता निर्माण करून वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.
तसेच “Good Touch, Bad Touch” याविषयी जागरूकता निर्माण करून विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता पानसे व आभार प्रा. नम्रता ब्राम्हणे यांनी मानले. कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि आत्मजागरूकतेबाबत सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.














