Home महाराष्ट्र हल्लीच्या समाजाची महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल का?

हल्लीच्या समाजाची महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल का?

105

आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरातील महिलांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करतो, ज्या महिला त्यांच्या कामाने समानता आणि महिला हक्कांच्या आदर्शांना बळकटी देत ​​त्यांना अधोरेखित करतात. जगभरातील महिला जीवनाच्या सर्व परिस्थितींमध्ये पुरुषांविरुद्ध समान पातळीवर स्पर्धा करत असताना भारतातील महिला सक्षमीकरणाचा इतिहास आणि उत्क्रांती घडवित आहे. भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मानदंड उंचावत आहेत आणि त्यांची उपस्थिती दाखवत आहेत. आज आपण एक राष्ट्र म्हणून किती पुढे आलो आहोत आणि भविष्यात आपल्याला काय पाहण्याची आशा आहे हे पाहण्यासाठी आठवणींच्या ओघात एक प्रवास करावा लागेल. 

         उत्तुंग तुझ्या भरारी पुढे

          गगन हे ठेंगणे भासावे

       तुझ्या विशाल पंखाखाली

             अवघे विश्व वसावे

       जगाच्याच इतिहासाचे अवलोकन केल्यास जवळपास प्रत्येक देशात स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी लढावे लागल्याचे दिसून येईल. अगदी अमेरिकेसारख्या देशातही एके काळी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता व त्यातून त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती. भारतात गरिबी, शिक्षण तसेच आपल्या हक्काची पुरेशी जाणीव नसल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असते. बलात्कारासारख्या घटना राजरोस घडत असतात. अनेकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतर घरच्यांकडून या मुलीला टाकून देण्यात येते तर नव-याने मारहाण करणे स्वाभाविक असल्याची मानसिकता आजही ग्रामीण भागातील महिलांमध्ये, त्यातही कष्टकरी वर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येते.

         कधी न कळली नराला

            तुझी किती महती

            तुझीच होती कृपा

          म्हणूनी संसारी रमती

       जन्माला येणा-या प्रत्येकास संघर्ष करावाच लागतो. मात्र, त्यात घरातून कुणाचाही पाठिंबा नसलेल्या एखाद्या महिलेच्या वाट्याला संघर्ष आला तर ती त्याचे कधीच भांडवल करताना दिसत नाही. उलट आलेल्या परिस्थितीला तोंड देत स्वतः ठरविलेले निश्चित ध्येय साध्य करेपर्यंत ती स्वस्थ बसत नाही. हा आतापर्यंतचा महिलांच्या बाबतीतला इतिहास आहे. असं असलं तरी कधी जन्मदात्री आई आपल्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलते, तर कधी बाप आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करतो.

         सुख शोधण्या निघाली

         खर्च केले आयुष्य पूर्ण

     शेवटी आयुष्याच्या वृक्षाची

    अलगद गळून पडले देह पर्ण

       परिस्थिती कुणाला काय करविती याचा काही नेम नाही. त्यामुळे कुणाच्या परिस्थितीची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यांच्या नैतिक मुल्यांवर अर्थात चारित्र्यावर बोट ठेवू नये. कधीकधी पाप हे पोटासाठी आणि प्रेमासाठी केलेलं पुण्य असते. वेश्यावस्तीत किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीची कहाणी ‘हौस’ नसते, तर ती ‘मजबुरी’ असते. म्हणजेच जिथे इच्छा नसतानाही आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे एखादी गोष्ट नाईलाजाने करण्यास विवश होते. त्यामुळे तिचा द्वेष करण्यापूर्वी तिच्या वेदना समजून घ्यायला पाहिजे.

          अखंड झाली अशीच 

         होळी तुझ्या भावनांची

             नसे कुनाला खंत

        जराही तुझ्या वेदनांची

       महिलांवरील अत्याचार, हिंसाचार, अन्यायाच्या घडामोडी सतत कानावर येत असतात. क्रौर्याची परिसीमा गाठणा-या काही घटनांमुळे तर संपूर्ण समाजमन ढवळून निघताना दिसते. अशा घटना स्त्रीचा संघर्ष नवा नसल्याचे सत्य पुन्हा एकदा समोर मांडतात. गेल्या काही वर्षांत महिलांमधील अत्याचारात वाढ होत असतानाच आता महिलाही महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ब-यापैकी पुढे येत आहेत. वेश्याव्यवसायात अडकलेल्या, अडकवू पाहणा-या, हुंडाबळी, नव-याकडून होणारा छळ अशा एक ना दोन अनेक समस्यांचा आघात झेलणा-या अश्राप महिलांना व मुलींना समाजात ताठ मानेने जगविण्यास शिकविण्याचे अद्भुत कार्य समजाकडून व्हायला पाहिजे.

      समाजात वागत असताना 

       विवेकी विचार चढे व्हावे

       महिलांना समजून घेण्या

         महिलांनीही पुढे यावे

       आजकाल कोणत्याही राष्ट्राने पुरुष आणि महिलांमधील कायदेशीर दरी कमी केलेली नाही. सध्या, जगभरातील पुरुषांना असलेल्या कायदेशीर अधिकारांपैकी फक्त ६४ टक्के अधिकार महिलांना आहेत. काम, पैसा, सुरक्षितता, कुटुंब, मालमत्ता, गतिशीलता, व्यवसाय आणि निवृत्ती यासारख्या जीवनाच्या मूलभूत क्षेत्रांमध्ये कायदा पद्धतशीरपणे महिलांचे नुकसान करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ हक्क, न्याय, कृती या थीम अंतर्गत सर्व महिला आणि मुलींसाठी समान न्यायातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन करते. भेदभाव करणारे कायदे, कमकुवत कायदेशीर संरक्षण आणि महिला नि मुलींचे हक्क नष्ट करणारे हानिकारक प्रथा आणि सामाजिक नियम.

           झुंज देत संकटांना

     जपत जा स्वत:चं स्त्रीत्व

          नाती जपताना मात्र

       शोध स्वत:चं अस्तित्त्व

       आज बहुतेक चर्चा महिला सक्षमीकरणाबद्दल असेल. पण महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे कुणालाही माहिती आहे का? महिला सक्षमीकरण ही एक तर्कसंगत प्रक्रिया आहे. आपण अतिमहत्त्वाकांक्षेला सक्षमीकरण समजले आहे. महिलांची स्थिती ख-या अर्थाने सुधारत नाही तोपर्यंत महिला दिनाचे औचित्य सिद्ध होणार नाही. महिला धोरण आहे पण ते गांभीर्याने अंमलात आणले जात आहे का? त्यांना त्यांचे हक्क मिळतात का हे पाहणे बाकी आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यावरच ख-या अर्थाने सक्षमीकरण होईल आणि त्यांच्यात काहीतरी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. महिला दिन साजरा करणे केवळ औपचारिकता राहू नये हे महत्वाचे आहे. 

      येता मार्चची आठ तारीख

 जाग्या होतात सामाजिक संस्था

  करतात जागतिक महिला दिन

विसरून स्त्रियांची आजची अवस्था

       आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे, तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठीही खास आहे. कारण स्त्री एक मार्गदर्शक, समर्थक आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे. ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, तर कधी जीवनसाथी म्हणून असते. तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणा-या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत, कारण त्या नसत्या तर आपले जीवन अपूर्ण राहिले असते. 

               पात्र एक परंतु

    भूमिका ती असंख्य साकारते

          स्त्री जन्माची कहाणी

           मी लेखातून रेखाटते

       प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात आणि ही गोष्ट खरीच आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकांतून आपल्या आयुष्याला दिशा देते, पाठिंबा देते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ ‘चूल आणि मूल’ या मर्यादेत पाहिले जात असे. मात्र, आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण, व्यवसाय, संशोधन, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्या केवळ घराचे घरपण जपत नाहीत, तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे.

      संस्कार, त्याग, ममता, प्रेम

       किती शब्दात तुला मांडावं

      कौतुकाने भरला महासागर

         तरीही त्याने ओसांडावं

       आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर त्या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत हे नाकारता येणार नाही. शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी विशेष योगदान दिले आहे. परंतु समाजात अजूनही काही लोकं आहेत ज्यांना महिला केवळ घराच्या चार भिंतींच्या आतच असाव्यात असे वाटते. केवळ भारतातच नाही तर विकसनशील देशांमध्येही महिलांच्या स्थितीत अजूनही पूर्णपणे सुधारणा झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. 

                पुन्हा पुन्हा तू

           जगलीस या जगात

           तगली तुझ्यामुळे ही

             माणूस नाम जात

       समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो महिलांना बसला आहे. एकविसाव्या शतकातही अनेक महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. आजही महिला आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. महिलांची स्थिती पहिल्यापासूनच योग्य असती तर कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची गरजच भासली नसती.

          तू हुरळून जाऊ नको

   या एक दिवसाच्या सोहळ्याने

         तू हे ही विसरू नकोस

     हे मिळालं मोठ्या संघर्षाने

 ✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here