


✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.16फेब्रुवारी):- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथील “निफ्टी अर्बन अँड फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी”’ निधीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, प्रशासकीय अनियमितता व लाच देण्याच्या आरोपांबाबत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी वनसंरक्षक व संचालक यांना अंतिम निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात मजुरांच्या नावाने निधी जमा करून तो अल्पावधीत काढण्यात आल्याचे प्राथमिक व्यवहारांवरून दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपस्थिती नोंदी व खर्च विवरणातील विसंगती, वनसंपत्तीशी संबंधित अनधिकृत गवत विक्री तसेच काही कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय, तक्रार मागे घेण्यासाठी एका अधिकाऱ्याने रुपये 2,00,000/- देण्याचा प्रस्ताव मांडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, त्यासंदर्भातील व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत दखलपात्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. माकणीकर यांनी मागणी केली आहे की,
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,
निधी व्यवहारांचे लेखापरीक्षण व फॉरेन्सिक तपास करावा,
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करावे,
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्तीची चौकशी करावी,
तसेच तक्रारदार संरक्षणाची अधिकृत नोंद घ्यावी.
दरम्यान, पूर्वनियोजित 26 जानेवारी 2026 रोजी आमरण उपोषणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रजासत्ताक दिन व शासकीय कारवाईचे औचित्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तो पुढे ढकलण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा ठाम इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेऊन पारदर्शक व उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.














