Home चंद्रपूर भाजप-उबाठा कराराचा ‘स्फोट’: वंचितला अंधारात ठेवून सत्तास्थापना?-स्नेहल रामटेके यांचा आरोप

भाजप-उबाठा कराराचा ‘स्फोट’: वंचितला अंधारात ठेवून सत्तास्थापना?-स्नेहल रामटेके यांचा आरोप

201

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चंद्रपूर(दि.16फेब्रुवारी):-महानगरपालिका महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठाने भाजपाशी केलेल्या कराराबाबत वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचितचे माजी शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी पत्रपरिषदेत केला. शेवटच्या क्षणी झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे वंचितचे दोन नगरसेवक सभागृहात गैरहजर राहिले आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रामटेके म्हणाले की, मनपा निवडणुकीत उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढले होते. महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत वंचितचे दोन्ही नगरसेवक त्यांच्या संपर्कात होते. त्यावेळी भाजपासोबत जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता. मात्र, पुढील एका तासात उबाठाने भाजपाशी करार करून मतदानासाठी सभागृहात प्रवेश केला. याच काळात वंचितचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहिले व त्यांचे भ्रमणध्वनीही बंद होते. त्यामुळे या साऱ्या घडामोडींबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले.

रामटेके यांनी स्पष्ट केले की, वंचित बहुजन आघाडी म्हणून काँग्रेससोबत जाण्याचा पक्षाचा ठाम निर्णय होता आणि पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाच मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लता साव व लहू मरस्कोल्हे या नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, उबाठाच्या अचानक झालेल्या निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलली.

महापौर निवडणुकीत वंचितच्या दोन नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे भाजपाच्या उमेदवाराला विजय मिळाला, तर उबाठाचा उपमहापौर झाला. वंचित सत्तेबाहेर राहिली. या पार्श्वभूमीवर वंचितच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करत स्नेहल रामटेके यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.

यावर प्रतिक्रिया देताना रामटेके म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणात माझा कोणताही वैयक्तिक दोष नाही. तरीही मला पदमुक्त करण्यात आले. येत्या दोन-तीन दिवसांत मी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सर्व घडामोडींची माहिती देणार आहे.”

दरम्यान, निवडणुकीनंतर वंचितचे दोन्ही नगरसेवक संपर्कात नसल्याचेही रामटेके यांनी सांगितले. या सर्व प्रकरणामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजप-उबाठा करारावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here