


✒️धरणगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
धरणगाव(दि.29नोव्हेंबर):-शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील उपशिक्षक तसेच सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांचा राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्री शक्तिपीठ पुणे, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने “महात्मा फुले जीवनपट ” फोटोफ्रेम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तहसीलदार अरुण माळी होते. प्रमुख अतिथी म्हणून देविदास महाजन, राजेंद्र महाजन, दशरथ महाजन, रमेश महाजन, सत्यशोधक प्रल्हाद महाजन, विधिकर्ते शिवदास महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सावित्री शक्तीपीठ पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब दशरथजी कुळधरण, समन्वयक जयकुमार परतवाडा, प्रकल्प समिती प्रमुख प्रा एस बी महाजन, विश्वासराव यादव, प्रभाकर चौधरी, भास्कर सातव यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, भडगाव या पाच तालुक्यामधून जवळजवळ २० पुरस्कारार्थींना “महात्मा फुले जीवनपट ” देऊन गौरविण्यात आले.
धरणगाव तालुक्यातून पी डी पाटील यांची सामाजिक – शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते “महात्मा फुले जीवनपट ” देऊन गौरविण्यात आले. पी डी पाटील यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये १०० पेक्षा जास्त सत्यशोधक विवाह, दशपिंडविधी व गृहप्रवेश हे महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन केलेले आहेत. पुरस्काराने जबाबदारी वाढते व प्रेरणा मिळते असे प्रतिपादन पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पी जी चौधरी यांनी केले.














