Home महाराष्ट्र “आगम म्हणजे मोक्षमार्गाचे साईन बोर्ड…”

“आगम म्हणजे मोक्षमार्गाचे साईन बोर्ड…”

139

 

जळगाव -महामार्गाने जात असताना ठिकठिकाणी सूचना फलक लावलेले असतात. ते वाचून समजत असल्यामुळे प्रवास सुकर होत असतो. प्रवासात कुठलीही शंका निर्माण होत नाही. प्रगती पथावर संशय उपयोगाचा नसतो. हेच तत्त्व जीवनगाडी आणि आध्यात्म प्रवासात लागू होते. जिनवाणी किंवा जैन आगम हे मोक्षमार्गावरील साईन बोर्ड असतात, असे अत्यंत मोलाचे विचार प.पू. डॉ. इमितप्रभाजी यांनी धर्मप्रवचनात व्यक्त केले. सम्यकत्वाला बाधा आणणाऱ्या शंका, कांक्षा, विती गिच्छा, पर पाखंडी, प्रशंसा अशा पाच दूषणांवर चर्चा सुरू आहे. त्यात त्यांनी उपस्थित श्रावक-श्राविकांशी सुसंवाद साधला.

जैन धर्मातील १८ पाप आणि ९ पुण्य हे जीवनाचे सहज मार्ग आणि नियम सांगतात. पुण्य कष्टाने, समर्पणाने मिळवावे लागते; पण पाप सहज घडते. प्रयत्न न करताही मन व कृती वाईट दिशेला वळते. ही गोष्ट स्पष्ट करताना एका कथेचा आधार घेतला गेला. एकदा राजसभेत गरीब ब्राह्मण आला. त्याने राजाला एक तत्त्व सांगितले, “धर्माचा जय आणि पापाचा क्षय!” राजा नेहमी हे स्मरणात ठेवत असे. गरीब ब्राह्मण राजाकडे जाऊन हेच तत्त्व सांगत असे. त्यामुळे त्याचा मान वाढला, आदर मिळू लागला. राजपुरोहिताला हे खटकलं. मग त्याने राजाला सांगितले, “हा ब्राह्मण मांस खातो, मद्य पितो म्हणून तोंड झाकतो.” पण ब्राह्मणाला मात्र सांगितले, “राजाशी बोलताना तुझी थुंकी त्याच्या तोंडावर जाऊ नये म्हणून तोंड झाक.” ब्राह्मण सच्चा होता, राजपुरोहित द्वेष करणारा पापी होता, तर राजा हलक्या कानाचा! राजपुरोहिताच्या सांगण्यावर विश्वास ठेवून राजाने ब्राह्मणासाठी बक्षीस आणि शिक्षा चिठ्ठीत लिहून दिली “हजार मोहरा, आणि नाक कापावे. “राजपुरोहिताने ब्राह्मणाकडून ती चिठ्ठी हिसकावली आणि खजिनदाराकडे दिली. पण तेच कर्म त्याच्याच वाट्याला आले. बक्षीस तर मिळाले, पण सोबतच नाक कापलं गेलं! महत्त्वाची गोष्ट अशी की पुण्य कठीण, तर पाप सहज घडते; तरी पुण्यच करावे लागते. जसे कर्म, तसे फळ; कोणाचेही वाईट करायला नको हा मोलाचा संदेश प.पू. नीलेशप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितला.

 

(शब्दांकन – किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here