


जळगाव – जीवनात ‘शुद्धी’, ‘प्रसिद्धी’ आणि ‘सिद्धी’ या तीन शब्दांना खूप महत्त्व आहे. ‘समकीत के ६७ बोल’ यातील “शुद्धी” या घटकावर चर्चा केली. व्यवहार सम्यक्त्वाच्या अंगांपैकी तो एक महत्त्वाचा भाग मानला जातो. “शुद्धी” म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावर असलेल्या साधकाची अंतःकरणाची शुद्धता, म्हणजेच त्याच्या श्रद्धेतील निर्मळता आणि दोषमुक्तता असणे हे सांगण्यात आले आहे. जैन धर्मात शुद्धीचे तीन प्रकार मानलेले आहेत. द्रव्य शुद्धी -हे बाह्य शुद्धतेशी संबंधित आहे. म्हणजेच वस्त्र, भोजन, साधन इत्यादींची स्वच्छता. यामध्ये अभ्यंतर शुद्धीबाबत देखील सांगण्यात आले. मन, वचन आणि काया शुद्धी याबाबत संबंध सांगितला. भाव शुद्धी – अंतःकरणातील भावनांची शुद्धता. यात राग, द्वेष, मोह यांचा अभाव आणि समत्वाची भावना असते. विचार शुद्धी – श्रद्धा आणि विचारसरणीतील शुद्धता. चुकीच्या मतांचा त्याग करून योग्य तत्त्वज्ञानाची स्वीकार्यता असणे या मध्ये सुदेव, सुगुरू आणि सुधर्म मानले जाते. भद्रपाल हे सुदेव, सुगुरू आणि सुधर्म यांना मानणारे एक आदर्श श्रद्धावान होते. नगरात त्यांचा लौकीक होता आणि राजा देखील त्यांचा आदर करत असे. एकदा पौषध व्रतामुळे भद्रपाल राजसभेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या द्वेषी मंत्र्याने राजाला चुकीची माहिती दिली, ज्यामुळे राजा रागावून भद्रपालावर तीर सोडण्याची शिक्षा देतो. परंतु भद्रपालाच्या अंतःकरणातील शुद्धीमुळे तो तीर त्यांच्या दिशेने न जाता उलट राजाच्या दिशेने जातो. हे पाहून राजा चकित होतो आणि संकटातून मुक्त होण्यासाठी त्यालाच भद्रपालला हात जोडून नमस्कार करावा लागतो. सिद्धी हवी असेल तर मन, वचन आणि कायीक शुद्धी अत्यावश्यक असते असे प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी धर्मप्रवचनात सांगितले.
परिग्रह कमी प्रमाणात चालू शकतो परंतु त्या वस्तुंच्याप्रती आसक्ती ठेऊ नये. परिग्रह सुटला तर मोक्ष प्राप्ती होऊ शकते. आपण ३१ मार्चला आपल्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे ऑ़डीट करत असतो परंतु आत्म्याच्या ऑडीटसाठी देखील मानवाने प्रयत्न करायला हवे. आपण परिग्रहापासून किती मुक्त आहोत याचेही ऑडीट करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये द्रव्य परिग्रह आणि भाव परिग्रह या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. परंतु आजच्या परिस्थितीत मात्र या भौतिक जगतामध्ये भावीक मात्र पार्श्वनाथ बाबाच्या मुर्तीसमोर उभे राहून मला दोन करोड रुपये, संपत्ती मिळावी याची याचना होते. परंतु भगवंताकडे हे मागणे आपण मागायला हवे की, आपला आत्मा मोक्ष मार्गी कसा येऊ शकेल याबाबत चिंतन करायला हवे असे आवाहन देखील प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात कथन केले.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)














