


चिमूर – ग्रामपंचायत शंकरपूर ही चिमूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून असून, या ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. लोकसंख्या जवळपास दहा हजार च्या वर असलेल्या शंकरपूर गावात ग्रामस्थांना मूलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम या ग्रामपंचायतीकडून होत आहे. शासन मान्य संस्थेने आयएसओ मानांकन प्रदान करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर, आर्थिक तपासणी, ग्रामपंचायतच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा व आरोग्य आदिची पाहणी करून गुणांकन ठरविले.
ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून ग्रामपंचायतीने गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. गावाचा विकास साधत असताना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे.
शंकरपूर येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून मा. सतीश वारजुकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, रोशन ढोक माजी उपसभापती यांच्या कल्पनेतून आणि सहकार्यातून तसेच मा. मीना साळुंखे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. गटविकास अधिकारी श्री नितीनजी फुलझेले, यांच्या मार्गदर्शनात सहा. गट विकास अधिकारी श्री.अशोक शामकुळे विस्तार अधिकारी श्री अरविंद उघडे यांच्या प्रयत्नांनी ग्रामपंचायतीने शासकीय योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली आहे. शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी इ गव्हर्नन्स चा वापर केला जात आहे, ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर फार्म व इतर दस्तऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे पूर्वावलोकन करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत चे सरपंच श्री साईश वारजूकर व ग्रामपंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी श्री केशव गजभे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण केल्यामुळे ग्रामपंचायत शंकरपूरला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. सदर आयएसओ मानांकन प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री अशोक चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती श्री रोशन ढोक यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी केशव गजभे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.













