Home चंद्रपूर समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत करार कर्मचारी यांना शासनसेवेत कायम सामावून घेण्यात...

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत करार कर्मचारी यांना शासनसेवेत कायम सामावून घेण्यात यावे – भाऊराव पत्रे

202

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. 9423608179

चंद्रपूर – राज्यात केन्द्र पुरस्कृत समग्र शिक्षा अंतर्गत सन 2001-02 पासून राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, संगणक प्रोग्रामर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा समन्वयक (बालरक्षक), जिल्हा समन्वयक (मुलींचे शिक्षण), संशोधन सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वरीष्ठ सहाय्यक (आस्थापना), वरीष्ठ सहाय्यक (लेखा), वाहन चालक,एमआयएस को ओर्डीनेटर, विषय साधनव्यक्ती अशा विविध पदावर करार पध्दतीने कर्मचारी कार्यरत आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांना शासनसेवेतून कायम सामावून घेण्याची मागणी शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.शिक्षण विभागातील प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यात समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांची निवड जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून जाहिरातीव्दारे बिंदूनामावलीनुसार करार पध्दतीने नियुक्ती झाली असून या कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडलेली आहे. बहुतांश कर्मचारी हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. तसेच सदर कर्मचारी उच्च शैक्षणिक अर्हताधारक असून अभियानात सेवापूर्व व सेवातंर्गत अनुभव घेतलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असून महागाईच्या काळात कुटूंबातील गरजा पुर्ण करणे अत्यंत कठीण होत आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंबंधाने दि. 22 जुलै, 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सदर कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत अभ्यास समिती गठीत करण्यास्तव निर्देशित करण्यात आलेले आहेत. तसेच दि. 06.08.2024 रोजी मुख्यमंत्री यांनी समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्याध्यर्थ्यांना सेवा देणारे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण, तालुका समन्वयक व विशेष शिक्षक असे एकूण 3105 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सदर अभियानात सुमारे 6176 अधिकारी/ कर्मचारी कार्यरत असून उर्वरित अधिकारी/ कर्मचारी यांच्यामध्ये व्यवस्थापन अंतर्गत 551 व कार्यक्रम (उपक्रम) अंतर्गत 2520 असे एकूण 3071 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

दिनांक 06.08.2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या 3105 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धरतीवर उर्वरित 3071 कंत्राटी अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सुध्दा शासन सेवेत कायम करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा या मागणीचे निवेदन शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,माजी आमदार कपिल पाटील यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here