Home महाराष्ट्र ” सत्यशोधकीय समाज जागृतीचे विचारपत्र : वऱ्हाड विकास ”

” सत्यशोधकीय समाज जागृतीचे विचारपत्र : वऱ्हाड विकास ”

207

“ वऱ्हाड विकास “च्या नावाप्रमाणेच मागील ३६ वर्षापासून समाज प्रबोधनाच्या कार्यात “वऱ्हाड विकास”ने विकास केलेला आहे म्हणूनच आज दि.१५ जुलै, २०२३ ला फुले- शाहू-आंबेडकरांच्या सत्यशोधकीय परिवर्तनवादी विचारांचे समर्थ साक्षीदार ठरलेले व सत्यशोधकीय समाज जागृती चे विचारपत्र ठरलेले मासिक “वऱ्हाड विकास ” आज ३७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हा क्षण म्हणजे “वऱ्हाड विकासच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीय होय.“वऱ्हाड विकास”चे संपादक सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड सन १९८० पासून समाज
प्रबोधात्मक लेखन करु लागले. त्यांचे पुरोगामी विचारांचे लेखन विविध वृत्तपत्रात प्रकाशित होऊ लागले,त्याच दरम्यान त्यांनी वैचारिक चळवळही सुरु केली. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील समता सैनिक म्हणून ते कार्यरत होते व अजही आहेत.

सन १९८५ मध्ये त्यांच्या मनात एक विचार आला की,आपल्या स्वत:च्या साप्ताहिकातून समाजापर्यंत समाज प्रबोधनात्मक विचार व चळवळ पोहोचविली तर आपल्या कार्याला अधिक बळकटी येईल, असे विचार त्यांच्या मनात सुरु असतानाच स्व. अँड. ज. सि. अकर्ते (दादासाहेब) यांची भेट झाली. ते राज्यसभा सदस्य होते.त्यावेळी “वऱ्हाड” या नावाला एक वेगळेच महत्त्व आले होते. प्रा.बनसोड यांनी नवीन साप्ताहिकासाठी “वऱ्हाड विकास” हे शीर्षक पाठविले. अँड. ज. सि. अकर्ते नेहमी दिल्लीला जात असत.दिल्लीच्या प्रसिद्धी कार्यालयातील अधिकाऱ्यांना “वऱ्हाड “शब्दाचा अर्थबोध होत नव्हता पण अँड. अकर्ते यांनी स्वत: “वऱ्हाड विकास ” हे शीर्षक मान्य करुन आणले आणि प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी दि.१जुलै,१९८७ ला “वऱ्हाड विकास साप्ताहिक सुरु केले. परंतु समाजातील काही समाजबांधव “वऱ्हाड विकास ” केव्हा बंद होणार या विचारात मग्न असतानाच “वऱ्हाड विकास”चा अंक आकोटचे स्व. भाऊसाहेब गणगणे यांच्या वाचण्यात आला होता, त्यांना तो खूप आवडला.संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांना त्यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले. भोजन झाल्यावर ५००/- रुपये प्रा. बनसोड यांना दिले.

आणि “पेपर छापण्यासाठी राहू द्या“ असे म्हणाले. प्रा. बनसोड यांना त्या ५००/- रुपयापासून मिळालेले प्रोत्साहन आजही त्यांच्या कार्याला उर्जा देते असे ते म्हणतात.स्व.भाऊसाहेब गणगणे यांच्या वृत्तपत्रीय दूरदृष्टीला आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या मदतीला प्रा.बनसोड अजूनही विसरले नाहीत. “वऱ्हाड विकास । सावित्री फुलेंचे । शाहू विचारांचे । प्रसारक ।| प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे सत्यशोधकीय परिवर्तनवादी पुरोगामी विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “वऱ्हाड विकास”चा परिपूर्ण उपयोग केला.वृत्तपत्र काढणे आणि ते सतत प्रसिद्ध करणे हे सतीचे
वाण आहे आणि प्रा.बनसोड यांनी ते स्वीकारले आहे.सतत ३६ वर्षापर्यंत “वऱ्हाड विकास’चे १२२६ अंक प्रकाशित करुन हजारो वाचकांपर्यंत ते पाठवून वाचन संस्कृती समृद्ध करण्याचा, सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला गतीशील करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.सेवानिवृत्तीनंतर पेंशनचा आधार घेऊर साप्ताहिकाच्या छपाईचा खर्च झेपणार नव्हता,म्हणून त्यांनी साप्ताहिकाचे रुपांतर दि.१५ जुलै २००० रोजी मासिकामध्ये करुन फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून समाजप्रबोधन व समाज जनजागृतीचा प्रयास “वऱ्हाड विकास”च्या लेखनीतून सुरु आहे व पुढेही सतत सुरु राहणार असे ते म्हणतात.

प्रा.बनसोड यांच्या समाजसेवी व परिवर्तनाच्या अनुभवातून “वऱ्हाड विकास” है विचारपत्र विज्ञाननिष्ठ व परिवर्तनवादी विचार समाजापर्यंत समर्थपणे पोहचवित आहे.परिवर्तनाची चळवळ ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.चळवळ ही सातत्याने गतीशील झाली पहिजे या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊनच “वऱ्हाड विकास ” ला त्यांनी जन्मास घातले.शासनाचा छोट्या वृत्तपत्राकडे बघण्याचा दृष्टिकोण आणि कागदाच्या सतत वाढत्या किंमती अशा कठिण परिस्थितीतही “वऱ्हाड विकास” स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यात समर्थ ठरलेला आहे.

“वऱ्हाड विकास । प्रबोधन केले । जन घडविले । शब्दांनीच।।”
भगवान बुद्ध,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्री माँ फुले, छत्रपती शाहू महाराज,गुरू रविदास महाराज इत्यादी थोर पुरुषांची राष्ट्रीय व सामाजिक विचारधारा घेऊन समाजप्रबोधन व समाजजागृती करणे, दारुबंदी व व्यसनमुक्तीच्या प्रचारासोबतच, दलित-आदिवासी,ओ.बी.सी., बारा बलुतेदार यांच्या न्याय् हक्कांना वाचा फोडणे, युवा पिढीला शासकीय योजनांची माहिती देणे,मतदारांमध्ये मतदान जनजागृती करणे,स्त्रीभूण हत्या थांबविणे,महिलांच्या विविध समस्यांना वाचा फोडणे इत्यादी विधायक व रचनात्मक कार्याची माहिती देण्यासाठी “वऱ्हाड विकास” कटिबद्ध असल्याचे संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांचे मत आहे. “वऱ्हाड विकास” या विचार पत्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे,विधवा-निराधार भगिनींना मदत,कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा सत्कार, सरपंच-उपसरपंच, पोलिस पाटील यांचा सत्कार, समाजाला प्रेरणास्त्रोत ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, “मी
प्रशासकीय अधिकारी होणारच” या अंतर्गत बहुजन समाजातील दहावी-बारावी नंतरच्या स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन, कोरोना संक्रमण काळात असंघटीत घरेलू महिला कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत,शेतमजुरांच्या लग्नाळू मुलींच्या विवाहासाठी मदतीचा हात देण्यासाठी “वऱ्हाड विकास “च्या माध्यमातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड सदैव
तत्पर असतात.

आंतरजातीय विवाह,सामुहिक विवाह,“शाखा तोडो – समाज जोडो ” तसेच समताधिष्ठित सामज निर्मितीच्या विचार प्रस्तावावर मासिक“वऱ्हाड विकास” मधून भर दिला जातो. या विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. आजची युवापिढी ही आदर्श – नीतीमान आणि सुसंस्कारित व्हावी, उद्योगप्रवण व्हावी म्हणून तज्ज्ञांच्या मुलाखती “वऱ्हाड विकास”मधून प्रकाशित केल्या जातात.“वऱ्हाड विकास” हे केवळ मासिक नसून वंचितांच्या, उपेक्षितांच्या, दुर्बलांच्या हक्क आणि अधिकारांना वाचा फोडणारे विचारपत्र आहे असे म्हणता येईल.आज “वऱ्हाड विकास ” हे फक्त साप्ताहिक राहिलेले नसून एक सामाजिक चळवळ झालेली आहे.अनेक कवी आणि लेखक यांच्या विचारांना समाजापर्यंत पोहचविणारे प्रभावी माध्यम झालेले आहे.अखिल भारतीय सत्यशोधक साहित्य परिषदेचे सदस्य,महात्मा फुलेंच्या विचारांचे प्रसारक,लेखक मा.श्री.सतीश जामोदकर मासिक “वऱ्हाड विकास” विषयी म्हणतात की, “महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारधारेने सत्यशोधक परंपरा राखीत बहुजन समाजातील पहिले पत्र “दीनबंधू” कृष्णराव भालेकर यांनी सुरु केले होते. ही परंपरा १९१० पासून १९३० पर्यंत जोरकसपणे सुरु राहिली. पुढे तिचा जोम कमी झाला.तीच परंपरा विदर्भात काही नियतकालीकांनी सुरु ठेवली. त्यात “वऱ्हाड विकास” या वृत्तपत्राचे नाव घ्यावे लागेल. “

प्रा.श्रीकृष्ण बनसोड व प्राचार्य डॉ.प्रवीण बनसोड यांनी ही परंपरा अजुनही सुरु ठेवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !”अखिल भारतीय माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अँड.संभाजीराव पगारे, धुळे यांच्या मते, “वऱ्हाडविकास हे विचारपत्र आहे.सामाजिक परिवर्तनाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य करीत आहे”.अमरावतीच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष व “वऱ्हाड विकास’चे वाचक मा.श्री.राजेंद्रजी आंडे यांच्या मते, “वऱ्हाड विकास बहुजन समाजाला वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा आणि दृष्टी देण्यात यशस्वी ठरलेले आहे.सामाजिक प्रबोधन व सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतल्यामुळे आपले वेगळे अस्तित्व व प्रभाव जनमानसाच्या मनावर “वऱ्हाड विकास”ने कोरलेला आहे.

संपादक प्रा.बनसोड यांच्या या कार्याला माझा सलाम”.माजी आमदार मा.श्री.सदाशिवराव माळी,धुळे यांच्या मते, “महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय विचारांना प्राधान्य देऊन “वऱ्हाड विकास” हे समाजामध्ये विज्ञानवादी विचार पेरत आहे.” मासिक “माळी आवाज’ “च्या संपादिका श्रीमती रागिणी विजयकुमार लडकत, पुणे यांच्या मते, “वऱ्हाड विकास”च्या माध्यमातून वाचकांना एक विचारपीठ उपलब्ध झाले आहे असे म्हणता येईल आणि हे परखड विचार संपादकीय लेखातून संपादक प्रा. बनसोड यांनी निर्भिडपणे प्रकाशित केलेले आहेत.”महात्मा फुले शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेचे मुखपत्र मासिक “समाज जागरण’च्या कार्यकारी संपादिका प्रा.सौ.
अल्का बाबारावजी झाडे यांच्या मते, “’वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्या सर्वसामान्यांना योग्य दिशा देण्याचे
काम “वऱ्हाड विकास” मधून झालेले आहे.आज ७५ व्या वर्षीही प्रा. बनसोड यांची अखंड सेवा या मासिकाच्या माध्यमातून सुरुच आहे. त्यांच्या या अखंड सेवेला शुभेच्छा!” मासिक “माळी वैभव”, नागपूरचे संपादक मा.मनोहर चलपे यांच्या मते,“प्रा. श्रीकृष्ण बनसोड मागील ३६बवर्षापासून “वऱ्हाड विकास’चे संस्थापक संपादक व पत्रकार आहेत.प्रबोधनपर सत्यशोधकीय लेखन प्रकाशित करु मासिकाच्या माध्यमातून त्यांची समाजजागृती आजही सुरु आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा! “

आज पर्यंत “वऱ्हाड विकास’च्या प्रबोधनपर वेगवेगळ्या प्रासंगिक विशेषकांचे विमोचन अनेक थोर मान्यवरांच्या शुभहस्ते झाले आणि त्या प्रसंगी त्यांनी “वऱ्हाड विकास’च्या वैचारिक समाज प्रबोधनाच्या कार्यांची थोरवी भाषणातून व्यक्त केली. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते “वऱ्हाड विकास “च्या वर्धापन दिनी “समाज प्रबोधन” विशेषांकाचे विमोचन झाले. केंद्रीय मंत्री.मा. रामदासजी आठवले,भूतपूर्व राज्यपाल स्मृतिशेष मा. दादासाहेब गवई,कादंबरीकार मा. उद्धव शेळके,मा.श्री.मधुकर अभ्यंकर, प्रा.मधुकरराव आमले,मा.श्री.शरदचंद्र सिन्हा,मा.मा.गो. वैद्य, मा.ना.छगनराव भुजबळ, मा.सुधाकर गणगणे, डॉ. हमीद नरेंद्र दाभोळकर, मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक दलित
साहित्य संमेलन विशेषांक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेषांक,दादासाहेब टोम्पे गौरव विशेषांक,परिवर्तनवादी
विशेषांक,उद्धव शेळके गौरव विशेषांक,महात्मा फुले समता परिवार विशेषांक,राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेषांक,अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांक,वनमहोत्सव विशेषांक या “वऱ्हाड विकास’च्या विशेषांकांचे विमोचन झाले.
असा हा सत्यशोधकीय परिवर्तनवादी विचारांचा साक्षीदार असलेल्या “वऱ्हाड विकास” या मासिकाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रबंध संपादक प्राचार्य डॉ. प्रवीण बनसोड आणि मंडळाला शुभेच्छा देतो व पुढेही त्यांचे हे मासिक अखंड सुरु राहण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही शुभकामना व्यक्त करतो.

“वऱ्हाड विकास । हार्दिक शुभेच्छा ।
मनस्वी सदिच्छा । जन्मदिनी ॥ “

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
समाज प्रबोधन काव्यफुले
पुरस्कार प्राप्त

✒️अभंगकार कवी-लेखक-वक्ते-समीक्षक,प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले रुक्मिणी नगर,अमरावती.भ्र. ध्व : ८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here