


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.12जुलै):-माण तालुक्यातील म्हसवड ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असून येथील पोस्टात नेमक चाललंय काय असा सवाल ग्राहक विचारत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन म्हसवड येथील पोस्टाचा कारभार सुधारला नाही तर कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदराव शेंडगे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की म्हसवड हे माण तालुक्यातील प्रमुख शहर असून याठिकाणी पोस्ट कार्यालय आहे. हे कार्यालय एसटी बस्थानकपासून किमान दिड किलोमीटर आहे.तर म्हसवड परिसरातील किमान ३० गावांचा कारभार पोस्टातून चालतो. या कार्यालयात कामासाठी किमान तीन माणसांची गरज असून त्याठिकाणी एक माणूस काम करीत आहे. त्यामुळे अनेक लोकांची कामे होत नाहीत. वयोवृद्ध लोकं दिड दोन किलोमीटर येतात व त्यांची विविध प्रकारची कामे होत नाहीत व अडकून पडावे लागतं आहे. आर डी,ठेव पावती, खात्यावरून पैसे काढणे, टपाल पाठवणे, अशा अनेक गोष्टीसाठी नागरिकांची अडचण होऊन बसली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तर सगळीकडे अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जाते.पोस्ट खात्यात आपली सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना आपली पेन्शन हि पोस्टातच मिळते परंतु या पेन्शनधारकाना सुद्धा या कार्यालयाकडून मनस्ताप सहन करावा लागतो अपंग, पेरालिसिस पेशन्ट, वयानी थकलेल्या पेन्शनधारकाना या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसते त्या पेन्शनधारकाना पोस्टातच आणण्याची सक्ती केली जाते
म्हसवड येथील जनता हा कारभार आता फार काळ सहन करणार नाही. तरी पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हसवड मध्ये जादा कर्मचारी नेमणूक करून ग्राहकांना सेवा द्यावी.अन्यथा पोस्ट कार्यालयाच्या विरोधात सामान्य नागरिक आंदोलन करून टाळे ठोकतील असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.













