


रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि. 24 एप्रिल):-
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन होऊन सहकार क्षेत्राची कमान हातामध्ये राहण्यासाठी राजकीय पक्षांचे मुत्सद्दी राजकीय डावपेच आखण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. येणाऱ्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आजघडीला जिल्ह्यात अग्रणी समजली जात आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बाजार समितीचा तालुक्यात मोठा पसारा आहे. बाजार समितीवर अधिपत्य वर्चस्व राहण्यासाठी तालुकास्तरीय राजकीय पुढारी सक्रिय झाले आहेत.
ब्रम्हपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षाकडून आमदार विजयभाऊ वडेट्टीवार करीत आहेत तर भारतीय जनता पार्टी कडून माजी आ. अतुल देशकर यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक लढवली जाणार आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकुण 17 जागेसाठी निवडणूक लढवली जात आहे. 28 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे ब्रम्हपुरीकरांचे लक्ष लागले आहे.
नवखे चेहऱ्यांची हालचाल सहकार क्षेत्रातील मान, प्रतिष्ठा आपल्याही वाटयाला यावी म्हणून राजकारणातील नवखे चेहरे पुढे येण्यासाठी राजकीय डावपेच आखताना दिसत आहेत. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मंडळी हेसुद्धा बाजार समितीचे राजवैभव मिळविण्यासाठी सक्रिय झाल्याचे त्यांच्या राजकीय हालचालीवरून दिसत आहे.













