Home महाराष्ट्र प्रथमता व अंतिमही भारतीय- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

प्रथमता व अंतिमही भारतीय- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

131

 

महामानव बौद्धीसत्व भारतीय घटनेचे निर्माते कोहीनुर हिरा प,पुज्य,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये बंद करून त्यांचे कार्य समजून घेऊन बाबासाहेबांना एका जातीचे व एकच धर्माचे मनाने म्हणजे अजूनही आपण आपल्या मेंदूचा वापर करून न घेतल्यासारखे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचार कधीही न वाचलेल्या लोकांच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीच्या आणि धर्माचे उदाहरण म्हणून आहेत . भारतामध्ये जातिवाद आजही एवढा भक्कम आहे ज्या बाबासाहेबांनी समस्त मानव जातीला समता, बंधुता, न्याय,व स्वातंत्र्य या गोष्टी बहाल केले. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजही जातीत बंद केले जाते. यातून आपली वैचारिक बेइमानी लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच जातीसाठी काम केले एका जातीच्या न्याय हक्कासाठी लढले याचा अर्थ बाकीच्या सर्व जातींना संविधानाच्या अगोदर किंवा बाबासाहेबांच्या अगोदर सर्वांना शिक्षण, आरक्षण, नोकरी, समता बंधुता ,न्याय ,व हक्क अधिकार होते असेच म्हणावे लागेल . हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या माणूस, माणुस असूनही माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार नसलेल्या, धर्मांच्या अनिष्ट रूढी परंपरेमध्ये बांधून ठेवलेल्या शिक्षणाची द्वार पूर्णपणे बंद असलेल्या मानव समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी अज्ञानरूपी अंधारातून काढून शिक्षणरूपी प्रकाश देऊन त्यांना संरक्षण दिले. धर्माच्या जाती उतरंडीमध्ये अनेक जाती निर्माण केल्या गेल्या आणि एकदा दुसऱ्या जाती वरती ठेवून प्रत्येक जात दुसऱ्या जातीला हीन कनिष्ठ व दुय्यम समजत होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींना समान करून एका लाईन मध्ये उभे केले. सर्वांना भारतीय म्हणून ओळख दिली. सर्वांना समान हक्क अधिकार, समता ,स्वातंत्र्य, न्याय दिला ह्या गोष्टी देताना बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही भेदभाव केला नाही. पूर्वीची परिस्थिती बघितली तर प्रत्येक जातीला वेगवेगळी वागणूक असे. स्वातंत्र्य, समता,न्याय आणि शिक्षण या गोष्टी लोकांच्या कल्पनेतही नसत तोंड असून बोलता येत नसेल. पाय असून चालता येत नव्हते, डोळे असून वाचता येत नव्हते, हात असून लिहिता येत नव्हते, अशी निष्क्रिय माणसांची भरती समाजामध्ये झालेली होती. या निष्क्रिय झालेल्या माणसांमध्ये प्राण टाकण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. वाचण्याचा किंवा शिक्षण असा अधिकार एकाच जातीला नव्हता असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्या मेंदूचा वापर हा शंभर टक्के बंद आहे असेच म्हणावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही जातीचा किंवा धर्माचा मर्यादित विचार केला नाही. उलट हजारो वर्षापासून ज्या समाजाला शिक्षण ,अधिकार, समता, स्वातंत्र्यापासून दूर ठेवले होते व सगळीकडे एकच वर्णाची हुकूमशाही होती, त्यार्णाची हुकूमशाही बाबासाहेबांनी तोडून टाकली म्हणून त्या एका वर्णा चे प्रचंड नुकसान झालेले आहे. आणि नुकसान झालेल्या वर्गांनी बाबासाहेब आंबेडकरांना अनेक अडथळे अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर हजारो वर्षापासून ज्या ज्या समाजाला हक्क अधिकार शिक्षण नाकारले गेले होते, महिलांचे हक्क अधिकार नाकारले गेले होते अशा घटकांसाठी बाबासाहेबांनी यशस्वीपणे काम करू नये. म्हणून अनेक अडीअडचणी त्यांच्यासमोर निर्माण करण्यात येत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपल्याला आपला मेंदू जागृत ठेवून संविधानापूर्वीची समाज व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला संविधानापूर्वीची समाजव्यवस्था समजली नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. मानवानेच मानवावरती एवढे अन्याय अत्याचार करावे, मानवानेच मानवाला एवढं तुच्छ लेखावे की मंदिरामध्ये जाण्याची मुभा नसावी? सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची मुभा नसावी? गावांमध्ये जाण्याची मुभा नसावी? एखाद्या माणसाला जर स्पर्श केला तर तो माणूस वाटायचा, एखाद्या माणसाने वरच्या जातीतील माणसाच्या अन्नाला जर स्पर्श केला तर ते अन्न पवित्र व्हायचे, एवढा तिरस्कार करणारी विषमतावादी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी उध्वस्त करून टाकली. धर्मग्रंथांनी अनेक बंधने लादून माणसा माणसांमध्ये भेद, महिलांना दासी बनवून अनेक वर्ष धर्माच्या नावावर लोकांचे मानसिक आर्थिक शोषण केले. आणि यातून समस्त मानवाला मुक्त करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला कधीच जाती धर्मात बांधून न घेता देशहिताचा विचार केला मी प्रथमही भारतीय आणि अंतिमही भारतीय असे रोखठोक बोलून, भारत देशाच्या हिताचे कामे त्यांनी केले संविधान लिहिताना सुद्धा कोणत्याही धर्माला अती महत्व न देता किंवा कोणत्याही धर्माला न डावलता धर्म बाजूला सारून माणसाला महत्त्व देऊन संविधानाची निर्मिती केली. आज आम्हाला बाबासाहेब समजून घेताना हजारो वर्षापासून असलेली विषमता अस्पृश्यता अज्ञान या गोष्टीवर बोलणे आवश्यक आहे. जर याच गोष्टीची जाणीव नसेल तर संविधानाचे व बाबासाहेबांचे महत्त्व कळणार नाही. आणि मुळात पूर्व परिस्थिती समजून घेणे इतकी बौद्धिक कुवत बहुतांश भारतीय लोकांमध्ये नाही. लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे पूर्ण आयुष्य खर्ची घातले आणि न्याय हक्क अधिकार मिळवून दिले, समतेचा अधिकार दिला, जी लोक गाव कुसा बाहेर राहत होते, ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्यांच्या स्पर्शाने अन्न बाटायचे, माणूस बाटायचा, शेती करणारे हीन असायचे, अशा लोकांना थेट देशाच्या सत्तेमध्ये वाटा देणारे बाबा साहेब एकमेव सच्चे भारतीय होते, आणि राहणार. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांची व्यवस्था उलथून टाकली अशा लोकांच्या पचनी बाबासाहेब आंबेडकर कसे पडणार? आणि संविधानानंतरही जे लोक विषमतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणारे होते तेच लोकसत्तेत असताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्य समाजापर्यंत का पोहचु देतील? उलट समाजामध्ये त्यांच्या कार्य व विचाराचा प्रचार होऊ नये म्हणून व्यवस्था निर्माण केली. की ज्यांनी महिलांचे हक्क अधिकार नाकारून महिलांना कोणते हक्क अधिकार नकोत असे सर्वांसमोर मत मांडले परंतु महिलांना अधिकार मिळत नाहीत म्हणून स्वतःच्या मंत्री पदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब खरंच एका जातीची असू शकतात? बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा परिवर्तनाचा फायदा देशातील हजारो जाती घेत आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हजारो जाती आपले मनात नाहीत ही शोकांतिका आहे. पुरोगामी देशांमध्ये आणि विशेषत: महाराष्ट्रामध्ये एकीकडे आम्ही म्हणतो जातिवाद संपलेला आहे, आणि दुसरीकडे ज्याच्या नावावर देशाचा कायदा आहे, त्यांनी सगळ्यांना समान हक्क अधिकार स्वातंत्र्य बहाल केलेले आहेत अशा व्यक्तीलाच जातीत बंद करून ते एकाच जातीचे उद्धारक आहेत असे उघडपणे सांगितले जाते. तेव्हा काय हे लोक जाती व्यवस्था मान्य करत नाहीत? देशाच्या घटनाकारायला जातीत बंद करणे म्हणजे सरळ सरळ आपण कायद्यासोबत व देशासोबत बेईमानी करणे होय. परंतु सत्य बोलायला विद्रोह समजला जातो. आज बाबासाहेबांच्या कार्य कोणकोणत्या बाबींवर होते हे ऐकणे लोकांना जातीवाद वाटतो, अरे एक विचार करा संविधानाच्या अगोदर ज्या जातींवर अन्य अत्याचार होत होते ते कसे सहन करत असतील? की जिथे संविधान लागू असताना बाबासाहेबांचे कार्य अनेकांना पचत नाही, तर ज्या घटकासाठी बाबासाहेबांनी कार्य केले त्यांनी अन्याय अत्याचार व सामाजिक विषमतेचे चटके कसे सोसले असतील? मानवतेला काळीमा फासणारी विषमता देशात नांदत होती. लोकांना प्यायला पाणी, रहायला गावात घर, मंदिरात प्रवेश मिळत नव्हता केवळ जाती मुळे. एवढी मोठ्या प्रमाणात विषमता व अस्पृश्यता होती. महिलांना अनिष्ट रूढी परंपरा मधुन बाहेर काढून तिलाही मन, भावना आहेत, तीही मानव आहे म्हणून तिला सुद्धा मानवाप्रमाणे हक्क अधिकारी पाहिजे म्हणून हिंदु कोड बिल तयार करून महिलांचा मान सन्मान वाढवून हक्क अधिकार मिळत नाही म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब एकमेव जागतिक महापुरुष होत. राजीनामा दिला नाही तर महिलांना पुरुषांप्रमाणे समान वेतन, प्रसुती पगारी रजा मिळणाऱ्या भारतीय महिला जगात पहिल्या आहेत. सहा महिने प्रसुती काळात पगार मिळतो तो फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच. सर्व मानवाला सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय होते. देशहीताला महत्त्व देऊन त्यांनी कार्य केले. एका जातीच्या धर्मासाठी त्यांना कार्य करायचे असते तर आज बाबासाहेब आंबेडकर यांची जातज्ञसर्वात श्रीमंत असती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्ता फायदा एकाच जातीसाठी केला नाही म्हणून चहा विकणारा प्रधानमंत्री होतो, आदिवासी महिला राष्ट्रपती होतात, ज्यांना गावात येण्याचा अधिकार नव्हता ते अधिकारी झाले. वरील कार्य व परिवर्तन एकाच जातीचे झाले असे बोलणे केवळ मानसिक गुलामीचे लक्षण होय. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य राष्ट्रासाठी व राष्ट्रातील जनतेसाठी होते कारण ते जसे स्वतः ला भारतीय समजत होते तसेच कार्य भारतीय लोकांसाठी केले म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर सच्चे भारतीय होतै याची प्रचिती येते.

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा.आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here