


✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)
इस्लामपूर(दि.4एप्रिल):-स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगून इतरांच्या धर्माचा आदर करणारे सांगलीचे फडके कुटुंबीय यांनी रोजा ठेवून धार्मिक सलोखा व एकात्मता चे उदाहरण गेली अनेक वर्ष समाजासमोर ठेवले आहे एकात्मतेविषयी बोलणे सोपे आहे परंतु आचरणात आणणे खूप अवघड आहे असे मत प्रा. महेबूब बारस्कर यांनी व्यक्त केले . ते पुढे म्हणाले की गणेशोत्सवामध्ये अनेक मुस्लिम बांधव गणपतीच्या मिरवणुकीत, विविध कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. या त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचा आदर ठेवून अनेक हिंदू बांधव रोजा ठेवून धार्मिक एकात्मतेचा प्रयत्न करत आहेत.
उपवासापेक्षा डोळ्याचा रोजा म्हणजेच वाईट नजरेने न बघणे, जिभेचा रोजा म्हणजेच वाईट न बोलणे,हाताचा रोजा म्हणजे कोणाचे वाईट न करणे,मनाचा रोजा म्हणजेच कोणाचेही वाईट न चिंतने असा असा रोजा असणे अभिप्रेत आहे असे रवींद्र फडके यांनी सांगितले.
सौ मीनाक्षी फडके यांनी गेली पाच वर्षे संपूर्ण महिनाभर रमजानचा रोजा (उपवास) ठेवत असल्याचे सांगितले व रोजामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खूप उपयोग झाल्याचे जाणवले असेही त्या म्हणाल्या, बारस्करअकॅडमी शामनगर सांगली येथे अझहर बारस्कर व मजहर बारस्कर यांनी रोजा इफ्तार चे संयोजन केले. दर रविवारी गरीब व गरजू लोकांना बारस्कर कुटुंबीयांच्या तर्फे अन्नधान्याचे किट दिले जाते. आतापर्यंत एक लाख ऐशी हजार रुपयांचे किट्स देण्यात आले असल्याचे प्रा. महेबूब बारस्कर यांनी सांगितले.













