


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.23एप्रिल):- न्यायालयाने ९ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर आणि त्यांच्या चालकाला निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्यातील विसंगतीमुळे कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. नऊ वर्षांपूर्वी एका महिलेने माजी आमदार आणि भाजप नेते डॉ. अविनाश वारजूकर यांच्या विरोधात बलात्कार आणि धमकावल्याचा गंभीर आरोप करत, भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी तब्बल नऊ वर्षानंतर भंडारा जिल्हा सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी 17 एप्रिलला हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यात डॉ. अविनाश वारजूकर आणि त्यांचे वाहन चालक आशिष नागदेवे यांना मोठा दिलासा मिळाला असून दोघांचीही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
महिलेने केलेल्या आरोपानुसार, 9 नोव्हेंबर 2015 ला भंडारा शहरातील एका हॉटेलमध्ये डॉ. अविनाश वारजुकर यांनी तिच्यावर बलात्कार करुन तिला धमकावलं असल्याचं म्हटलं. मात्र न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यात धक्कादायक बाब उघडकीस आली. सदर महिला आणि तिचा मित्र कैलास गोलछा याच्यासोबत एका हॉटेलमध्ये एकाच खोलीत थांबले होते. त्या रात्री दोघांनी दारु पिऊन जेवण केले असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्याने म्हटले.
महिलेच्या कुटुंबियांसोबत डॉ वारजुकर यांचे कौटुंबिक संबंध असल्याने वारजुकरांनी ही बाब तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनात आणून दिली. महिलेचं बिंग फुटेल या भीतीने या महिलेने डॉ वारजुकर यांना फसवण्यासाठी कैलास गोलाच्छा याच्या मदतीने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली होती.
यात साक्ष आणि पुरावे तपासल्यानंतर महिलेने दिलेली तक्रार खोटी असल्याचं सोबतच साक्ष आणि पुराव्यात विसंगती आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने डॉ अविनाश वारजूकर आणि त्यांचे वाहन चालक आशिष नागदेवे या दोघांनाही या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे.














