


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️मंत्री गोरेनी धुळदेव, चिमणगावसह इतर ठिकाणच्या अपूर्ण कामांबाबत दिला अल्टिमेटम
म्हसवड(सातारा):- राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते पंढरपूर या रस्त्याच्या सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामांबाबत ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे कमालीचे आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी माण तालुक्यातील धुळदेवसह गोंदवले, दिवड, पळशी, चिमणगाव येथील अपघातांचे ब्लॅक स्पॉट्स अधोरेखीत करुन त्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), सातारा जिल्हा भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशीलदादा कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.
सातारा – पंढरपूर – लातूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा जिल्ह्यातील काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने असंख्य अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. नुकताच धुळदेव येथे भीषण अपघात होवून दोन जणांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त अपघात होवून १५ जणाचा मृत्यू झाला आहे तर ६० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले असल्याचे ना. जयकुमार गोरे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
दिवड गावच्या हद्दीत पूलाचे अर्धवट काम पूर्ण होईपर्यंत डांबरीकरण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. पळशी येथेही ५० मीटर लांबीच्या अपूर्ण रस्त्यावर तात्पुरते डांबरीकरण करणे, गोंदवले येथील नियमापेक्षा अधिक ऊंच केलेले गतीरोधक काढून योग्य निकषाप्रमाणे गतीरोधक करण्याच्या सुचना मंत्री गोरे यांनी दिल्या.
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील ३० मीटर लांबीचा ब्लॅक स्पॉट अडचणीचा ठरत असल्याने तेथे डांबरीकरण करणे आणि पिलीव ते पंढरपूर दरम्यान ज्या ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे तिथे डांबरीकरण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. बैठकीत आवश्यक त्या ठिकाणी आठवड्यात डांबरीकरण, पर्यायी वळण मार्ग करण्याचे निर्णय घेण्यात आले. धुळदेव येथील रस्ता आणि पळशी येथील पूलाचे काम डिसेंबर अखेर मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.














