Home महाराष्ट्र भोंदू बाबांवर कार्यवाही करण्याची चार्वाक दर्शन मंचची मागणी

भोंदू बाबांवर कार्यवाही करण्याची चार्वाक दर्शन मंचची मागणी

138

▪️तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.29मार्च):-महाराष्ट्रात उघडकीस आलेल्या खरात फाईल्स प्रकरणामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली असून,अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी भोंदू बुवा-बाबांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी चार्वाक दर्शन मंच,गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार,गंगाखेड यांच्या मार्फत (दिनांक २७ मार्च शुक्रवार) रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे राज्यात खरात फाईल्स प्रकरणातून लोकांची आर्थिक फसवणूक तसेच महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे.

हे प्रकरण केवळ हिमनगाचे टोक असून,महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात भोंदू बाबांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हाजारो-लाखो अशा फाईल्स अजूनही अंधारात दडलेल्या असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.समाजात गुरु,गुरुमावली,महाराज,स्वामी,धर्मगुरू,ज्योतिषी,वेदवेत्ता,योगी अशा विविध विशेषणांनी वावरणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्या चारित्र्याची पडताळणी,संपत्तीचा तपशील,तसेच शैक्षणिक पात्रता यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच नागरिकांकडून आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाबाबत तक्रारी जाहीर किंवा गोपनीय पद्धतीने मागवण्याची व्यवस्था करावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल,आर्थिक शोषण व महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण केले जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.विविध कर्मकांड, गंडे-दोरे,दानधर्म यांचा आधार घेऊन लोकांना भावनिक बनवले जाते आणि त्यातून त्यांचे शोषण केले जाते,असे नमूद करण्यात आले आहे.महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात डॉ.नरेंद्र दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे,गौरी लंकेश,प्रा.कलबुर्गी यांनी विज्ञानवादी विचारांसाठी बलिदान दिले.

तरी देखील आज भोंदूगिरीमुळे समाज पुन्हा अंधश्रद्धेकडे ढकलला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.मी शंकर तू पार्वती असे सांगून महिलांचे शोषण करणाऱ्या प्रकरणांसह अनेक धक्कादायक घटनांमुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अशा भोंदूगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर कॉ.ओंकार पवार,सुरेश इखे,शिवाजी कांबळे,कॉ.योगेश फड,संदीप जाधव,राहुल साबणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here