Home महाराष्ट्र मंदिरंही माणसांकरिता बंद असतात तेंव्हा..

मंदिरंही माणसांकरिता बंद असतात तेंव्हा..

108

भारतात मंदिरांची निर्मिती साधारणतः इसवीसनाच्या पाचव्या शतकात सुरू झाली . मंदिर हे पुजास्थळ असते तेंव्हा त्या त्या धर्माच्या प्रत्येक स्त्री पुरुषास मंदिरात जाऊन पूजा करता आली पाहिजे , मात्र मंदिरं फक्त उच्य वर्णीय पुरुष लोकांकरिताच होती . काही मंदिरात विशिष्ट भागापर्यंत ऊच्य वर्णीय स्त्रीला प्रवेश असायचा . शूद्र , अतिशूद्र लोकांना मात्र कोणत्याच मंदिरात प्रवेश नव्हता . एवढेच नाही तर हिंदू धर्मात अस्पृश्य लोकांना मरणासन्न जीवन जगावे लागत असे . सवर्ण समाजाचे देव आलिशान , भव्य दिव्य मंदिरात असायचे तर अस्पृश्य समाजाचे देव हे उघड्यावर असत . त्यांच्या देवावर कुत्रे , मांजरं संडास , लघवी करून घाण करत असत तर सवर्ण समाजाच्या देवावर सोने , चांदी चे आभूषणे चढवली जात . मात्र ना मंदिरातील देवाने कोणता चमत्कार करून जित्याजागत्या अस्पृष्याला मंदिरात बोलावले ना उघड्या वरच्या देवाने अस्पृश्यता लादणाऱ्याला काही अद्दल घडविली . तसे तर माणसानेच स्वतःचे पोट भरण्याचे साधन म्हणून देवाला तयार केलेलं आहे मात्र माणसचं त्या देवाच्या नावावर माणसाची खांडोळी करू लागले . 

     १८ व्या शतका आधी अस्पृश्य समाज आम्ही सुध्दा माणसं आहोत , आम्ही सुद्धा देवाची लेकरं आहोत , तुमचा व आमचा धर्म जर एकच आहे तर आम्हालाही मंदिरात पूजा करुद्या असे म्हणण्याच्या पलीकडं होता . १८ व्या शतकात धार्मिक , सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे पर्व सुरू झाले , अस्पृश्य समाजात जागृती केली जाऊ लागली , अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगू लागले . या परिवर्तनाच्या काळात अस्पृश्य समाजास मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून चळवळ सुरू झाली . भारतात मंदिर प्रवेश मिळावा म्हणून अस्पृश्य समाजाने सन १८०६ मध्ये पहिला लढा दिला . केरळ राज्यातील वायकोम येथील २०० अस्पृश्य समाजाने एकत्र येत मंदिर प्रवेश करण्या विषयी सत्याग्रह केला तेंव्हा त्यांच्यावर प्रचंड लाठीमार झाला यात काहींना आपला प्राण गमावावा लागला , बरीच मंडळी जखमी झाली . १८७४ मध्ये मद्रास मध्ये असेच एक आंदोलन झाले . या वेळेस सुद्धा काही अस्पृश्य आपल्या जीवास मुकले . 

      ३० मार्च १९२४ ला पुन्हा केरळ राज्यातील वायकोम मध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. येथील महादेवाच्या मंदिरात जाण्या करिता चार रस्त्ये होते . अस्पृश्य समाजास त्या मंदिरातच काय त्या रस्त्याने सुद्धा चालण्याची मुभा नव्हती . तेंव्हा ई. व्ही. रामस्वामी नायकर ( पेरियार ) यांनी तिथल्या अस्पृश्य समाजाला त्या मंदिराच्या रस्त्या वर चालण्या बरोबरच मंदिरात प्रवेश मिळवून देण्या करिता आंदोलन केले . या आंदोलनात टी. के. माधवन , के. केलाप्पण , के. पी. केशव मेनन सहभागी झाले . पेरियार यांना अटक करण्यात आली . त्यांनी जेल मध्ये राहून सत्याग्रहाचे नेतृत्व केले . हा लढा २३ नोव्हेंबर १९२५ पर्यंत चालला . पुढं १९३६ मध्ये त्या मंदिरात जाण्याची अस्पृश्य समाजास परवानगी मिळाली . या घटनेचे महत्व लक्षात घेऊन वायकोम येथे दिनांक ३१ जानेवारी १९९४ रोजी रामस्वामी पेरियार यांचा पुतळा उभारण्यात आला .

      वायकोम सत्याग्रहानंतर या पद्धतीचे सत्याग्रह होत राहिले मात्र सर्वात मोठा लढा महाराष्ट्रातील नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला . अस्पृश्य समाजास मंदिरात प्रवेश मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात , राहणीमानात काही फरक पडणार नव्हता किंवा त्यांचा काही उध्दार होणार नव्हता . त्यांचा उघड्या वरचा देव त्यांचा उध्दार करत नव्हता म्हणून ते सर्व सुख सोइंनी युक्त असलेल्या मंदिरातील रत्नजडित देवाच्या दर्शनाला जाऊन आपला उध्दार करणार नव्हते तर आम्ही सुद्धा माणसं आहोत , जर आपला धर्म एकच आहे तर आपल्या धर्माच्या देवाचे दर्शन तुम्ही जसे घेतात तसेच आम्हालाही घेऊ द्या हा समानतेचा हक्क मागण्या करिता मंदिर प्रवेश सत्याग्रह होता .

      २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्य समाजास प्रवेश देण्यात यावा या मुख्य मागणी करिता मंदिरावर सत्याग्रह केला . या करिता नाशिक येथील नेत्यांची एक सत्याग्रह समिती केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली . दादासाहेब गायकवाड यांना चिटणीस केले . पांडुरंग सबनीस , सावळेराम दाणी , तुळशीराम काळे , शिवराम मारू , गणपतराव कानडे , अमृतराव रणखांबे , रावबा ढेंगे , संभाजी रोकडे, नाना चंद्र मोरे , रंगनाथ भालेराव , महंत बर्वे , भगवान बागुल , लिंबाजी भालेराव ई. मंडळी समितीचे सदस्य होते .

    सत्याग्रहाला सुरवात करण्या आधी बाबासाहेबांनी जनतेला मार्गदर्शन केले . त्यांनी सांगितले की , काळाराम मंदिरात आपल्याला प्रवेश मिळाल्याने आपले प्रश्न सुटणारे नाही , आपले प्रश्न राजकीय , आर्थिक , सामाजिक , धार्मिक असे खूप आहेत . मंदिर प्रवेश करून आम्ही अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक समता निर्माण करू पाहत आहोत . भाषण झाल्या नंतर सर्व लोक काळाराम मंदिराकडं निघाले . मंदिराजवळ आल्या नंतर पोलिसांनी त्यांना अडविले . मंदिराच्या सर्व दरवाज्यास कुलूप लाऊन शस्त्रधारी पोलीस उभे होते . मंदिराच्या आजूबाजूस प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . जिल्हाधिकारी स्वतः तिथं हजर होते . बाबासाहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जोपर्यंत आम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांततेने आंदोलन सुरू ठेवू असे सांगितले. त्यानंतर मंदिराच्या चारही दरवाज्यावर २५ – २५ लोकांचे जथ्ये लावण्यात आले. दररोज तिथं धरणे धरले जात होते . मंदिरात पुजाऱ्याला सुद्धा जाता येत नव्हते .

       पुढं ९ एप्रिल १९३० रोजी येणाऱ्या रामनवमीच्या दिवशी ओढल्या जाणाऱ्या रथाला सवर्ण व अस्पृश्य लोक सोबतच ओढतील असे सवर्ण व अस्पृश्य अश्या दोघं पक्षात मान्य करण्यात आले . रथाच्या दिवशी मात्र अस्पृश्य लोकांना रथास हात लावू न देताच सवर्ण लोकांनी रथ ओढावयास सुरवात केली , त्यामुळे काही अस्पृश्य पुढं सरसावत रथाला धरू लागली तेंव्हा मोठयाप्रमाणात दगडफेक सुरू झाली . काही सवर्ण लोक लाठ्या – काठ्या घेऊन आले व त्यांनी अस्पृश्य लोकांना मारहाण सुरू केली . दगडांचा वर्षाव सुरूच होता . दगडं फेकणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांच्या दिशेने दगडं भिरकावले तेंव्हा अस्पृश्य लोकांनी बाबासाहेबांना कडे केले व सर्व दगडं स्वतःच्या अंगावर झेलले. या प्रसंगी बरीच मंडळी घायाळ झाली होती . 

          या नंतर नाशिक मधील सवर्ण लोकांनी जिल्हाभरात अस्पृश्य समाजावर हमले सुरू केले. काही गावांमध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला . असे असले तरी मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरूच राहिला . सवर्ण व अस्पृश्य संघर्ष अधिक तीव्र होत गेला . अस्पृश्यता निवारण्याचा कार्यक्रम हातात घेणारे , अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश द्या असे म्हणणारे महात्मा गांधी त्यांच्या जून १९३० च्या ‘ यंग इंडिया ‘ या दैनिकात या सत्याग्रहा बद्दल लिखाण करतात खरे , पण त्यांनी सत्याग्रहाची बाजू न घेता आंदोलन थांबविण्यात यावे असे आवाहन केले . महात्मा गांधी यांनी खरे तर या आंदोलनाची पाठराखण करायला हवी होती , प्रसंगी ” मी या सत्याग्रहात सहभागी होईल ” असे लिहायला हवे होते . तसे न करता अस्पृश्य समाजास आंदोलन थांबविण्याचा सल्ला देतात यातून त्यांचे अस्पृश्य समाजाविषयी बेगडी प्रेम तर दिसून येतेच तसेच अस्पृश्यतेचे ते निव्वळ राजकारण करू पाहणारे होते असे दिसून येथे .

    या नंतर सुद्धा काही ठिकाणी मंदिर प्रवेशाचे आंदोलन झाले नाही असे नाही , मात्र काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह जेवढ्या मोठ्या संख्येने झाले , जेवढे वर्षे ( सुमारे ५ वर्षे ) चालले , दोन समूहात जेवढा संघर्ष झाला तेवढ्या मोठ्या स्वरूपाचे आंदोलन नंतर झाले नाही . या आंदोलनाचे पडसाद गोलमेज परिषदेवर पडले , लंडन येथील दैनिकात त्याला प्रसिध्दी दिली गेली . येवढे मोठे जनआंदोलन झाले असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या संदर्भाने काही दखल घेतली नाही , केरळ सरकारने वायकोम येथे पेरियार यांनी केलेल्या मंदिर प्रवेशाची दखल घेऊन त्या मंदिर परिसरात पेरियार यांचा भव्य पुतळा उभारला . 

    आज मंदिर प्रवेशाचे आंदोलन होत नाही , सर्वानाच मंदिर प्रवेश मोकळा झाला असला तरी राष्ट्रपती सारख्या व्यक्तीस मंदिरात अपमानित केले जाते , खालच्या जातीच्या लोकांना बेदम मारले जाते , महिलांना प्रवेश नाकारला जातो , लग्नाच्या वऱ्हाड मंडळींना हुसकावून लावले जाते , तरी आम्ही गुमान सहन करत असतो . यातून अस्पृश्य समाजा विषयी आजही अन्य लोकांच्या मनात किती तिरस्कार आहे याची वेळोवेळी प्रचिती येते . आता काळ बदलला आहे , मंदिराचे राजकारण उघड झाले आहे तेंव्हा ‘ ज्यांना मंदिरात येऊ दिले जात नाही त्यांनी खरेतर आम्हीच मंदिरात येणार नाही , ज्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही त्या मंदिरात आम्हीच काय आमचे नवरे सुद्धा त्या मंदिरात जाणार नाही ‘ अशी चळवळ चालविणे काळाची गरज आहे .

✒️लेखक:-जयसिंग वाघ(अजिंठा हाउसिंग सोसायटी अजिंठा चौक जळगाव)मो:-९८८१९२८८८१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here