


✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.23फेब्रुवारी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘मी आणि माझे साहित्य लेखन’ या विषयावरील साहित्यिक व कादंबरीकार डॉ. युवराज पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिरपूर येथील आर.सी.पटेल महिला महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक तसेच साहित्यिक व कादंबरीकार डॉ. युवराज पवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्यांचा परिचय मोहिनी पाटील यांनी करुन दिला.
याप्रसंगी गंगा करंकाळे, कविता माळी या विद्यार्थिनींनी मराठी भाषा संवर्धन संदर्भात आपले विचार व्यक्त केले तसेच अनुष्का अहिरे, तृप्ती पाटील व भावना कोळी या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात कवितांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी ‘मी आणि माझे साहित्य लेखन’ या विषयावर मार्गदर्शन करताना साहित्यिक व कादंबरीकार डॉ. युवराज पवार म्हणाले की, ‘नवनिर्माणाची शक्ती युवकांमध्ये आहे. साहित्य लेखनासाठी तपस्या, साधना प्रतिभा शक्तीची गरज असते. आपल्यातील साधनेला तसेच प्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास यश मिळते.
विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर, ध्यासावर प्रेम करावे. हिंमत, जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश मिळवता येते. लोकांनी प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे. लेखक होण्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता असते. वाचनाने मेंदू प्रगल्भ होतो. विचारांचे सौंदर्य वाढविण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. यावेळी त्यांनी ‘शर्यत’ या बसमध्ये पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या बालमनाचे भावविश्व रेखाटणाऱ्या कथेचे कथाकथन सादर केले.दयन कादंबरी निर्मितीची प्रक्रिया व परीक्षा या कथेची निर्मिती मागील भूमिका कथन केली. कथा लेखनासाठी सूक्ष्म निरीक्षण क्षमता व प्रश्न जाणून घेण्याची तयारी हवी. घटनांना शब्दात पकडण्याची क्षमता लेखणीत असेल तर दर्जेदार साहित्य लेखन करता येते. यावेळी कथाकथनाला तसेच ‘आला उन्हाळा जहरी’ या कवितेला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
दि. 14 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 या दरम्यान मराठी विभागातर्फे मराठी ‘भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर व व्यंगचित्र स्पर्धा, कविता गायन व वाचन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा स्पर्धा व शब्दसंपदा उपक्रम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा समारोप यावेळी करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच साहित्य वाचनाची आवड जोपासली पाहिजे. त्यातून आपल्यात वैचारिक प्रगल्भता निर्माण होऊन मानसिक आनंद मिळतो त्याचबरोबर सर्जनशीलता विकसित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. एम. एल.भुसारे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सी. आर. देवरे, ड. आर. आर. पाटील, सौ. सुनंदा नन्नवरे, चेतन बाविस्कर, मोहिनी पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.














