


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.21फेब्रुवारी):-सेमाना विद्या व वन विकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली, द्वारे संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर, येथे दिनांक 19 फेब्रुवारी, रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. हनवते मॅडम, तसेच डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. निलेश ठवकर, प्रा. संदीप मेश्राम, डॉ. युवराज बोधे आणि प्रा. विवेक माणिक उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्यची संकल्पना आणि त्यांच्या आदर्शांच्या आजच्या पिढीने अंगिकार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात रा.से.यो. स्वयंसेवक मुकेश भिमटे आणि स्वयंसेविका कु. सविता नन्नावरे यांच्याद्वारे प्रस्तुत शिवगर्जनेमुळे महाविद्यालयाच्या वातावरण शिवमय झाला. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्याच एक भाग म्हणून, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चिमूर शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
पदयात्रेची सुरुवात महाविद्यालय परिसरापासून करण्यात आली. या पदयात्रे दरम्यान ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि इतर देशभक्तीपर घोषणाबाजी करून परिसरात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. बिजनकुमार शील आणि आभार प्रदर्शन डॉ. सुमेध वावरे यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.














