Home महाराष्ट्र अजित पवार यांच्या मृत्यूनंतरही घडामोडी-ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

अजित पवार यांच्या मृत्यूनंतरही घडामोडी-ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

209

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवार आणि त्यापूर्वी अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे यांनी सवाल उपस्थित करताच भाजपवाले शरद पवारांची ‘मदत’ घेत आहेत. ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त करताच, पवारांनी घातपात नसल्याचा खुलासा केला होता. परंतु अंत्यविधीच्या वेळी झालेल्या गर्दीचे रूपांतर कोणत्याही अप्रिय घटनेत होऊ नये, यासाठी पवार साहेबांनी हे वक्तव्य केले होते. याचा अर्थ त्यांच्या मनातही प्रश्न नसतीलच, असे नाही. परंतु भाजपवाल्यांना अचानकपणे पवार साहेब हे किती जबाबदार नेते (वास्तवात तसे ते आहेतच) याचा साक्षात्कार झाला! अडचणीत असताना कोणाचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे या बोक्यांना बरोबर माहिती असते. 

दीनदयाळ उपाध्याय हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नंतरचे जनसंघाचे सर्वात मोठे नेते होते. परंतु ११ फेब्रुवारी १९६८ ही त्यांच्या दृष्टीने काळरात्र ठरली. जनसंघाच्या कालिकत अधिवेशनात उपस्थित राहून पंडित दीनदयाळजी प्रवासाला निघाले. तेथून ते बंगळुरू जिल्ह्यातील दोड्डबल्लापूर येथील शिबिरात गोळवलकर गुरुजींना भेटण्यासाठी गेले. गुरुजींच्या आग्रहास्तव स्वयंसेवकांसमोर त्यांचे बौद्धिक झाले. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम. 

११ फेब्रुवारी १९६८ ही रात्र त्यांच्या दृष्टीने अंतिमच ठरली.. दुसऱ्या दिवशी एका सिग्नलपाशी त्यांचे मृत शरीर कामावर जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आढळले. दीनदयाळजींचा मृत्यू हा अपघाती मृत्यू म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. पण त्यांचा मृत्यू हा अपघाती नव्हता. ती राजकीय हत्या होती, असा आरोप तेव्हा झाला होता आणि त्यानंतर वर्षानुवर्षे हा आरोप करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत रहस्यमय परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येते. लखनऊ ते पाटणा प्रवासात असताना त्यांचा मृतदेह खांबाजवळ सापडला. सीबीआयने चौकशी केली. भरत लाल आणि राम अवध या दोन व्यक्तींना चोरी करताना पकडल्यामुळे, त्यांनी पंडितजींना ढकलून दिल्याचे आरोप झाले. परंतु पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. तरीदेखील पंडितजींच्या मृत्यूबद्दल जनसंघ आणि नंतर भाजपवाले प्रश्न उपस्थित करत राहिले. लोकशाहीने दिलेला त्यांचा तो अधिकार आहे. अर्थात दीनदयाळजींचा मृत्यू हा दुर्देवीच होता, यात शंका नाही. पण मग याच प्रकारे रोहित पवार यांनी अनेक तपशील पुढे आणून, अजितदादांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला, तर त्यात चुकीचे काय? संपूर्ण महाराष्ट्राला प्रिय असलेल्या अजितदादांच्या मृत्यूची नि:पक्षपाती पद्धतीने चौकशी व्हावी, एवढीच अपेक्षा आहे. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू झाला, तेव्हा सरकारी यंत्रणांवर लोकांचा विश्वास होता. आज मात्र तो राहिलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात पंडितजींचा झालेला मृत्यू हा धक्कादायक होता आणि दुःखदायक देखील. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूला देखील संघ, जनसंघ, भाजपवाले राजकीय हत्याच मानतात. त्यानंतर दुसरे अध्यक्ष डॉ. रघुवीर यांचा अपघाती मृत्यू झाला आणि नंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली. नंतरच्या पंधरा वर्षात त्यांनी भारतीय जनसंघाचा पाया व्यापक करण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी ‘राष्ट्रधर्म’, ‘स्वदेश’ या साप्ताहिकांचे संपादनही केले होते. 

दीनदयाळजी एकदा म्हणाले होते की, आपल्याला हे दाखवून द्यायचे आहे की, जनसंघ हा इतर पक्षांहून वेगळा आहे! सत्तेसाठी सिद्धांत गुंडाळून ठेवणाऱ्या पक्षांचा आपल्या देशात तुटवडा नाही. आपल्यालाही सत्ता हवी आहे आणि आपण ती मिळवूही. परंतु आपली नजर खुर्चीच्या पलीकडेही आहे. ती नजर हटवणार नाही, ध्येय सोडणार नाही. भारतीय जनसंघ सत्तेसाठी हपापलेला नाही. आज जनसंघाचा नवा अवतार म्हणजेच भाजप. तो इतरांपेक्षा वेगळा राहिला आहे का? सत्तेसाठी तो हपापलेला नाही, असे कोणाला तरी वाटते का? जनसंघाला केवळ काँग्रेसला विरोध करायचा नाही किंवा तिला सत्ताभ्रष्ट करायचे नाही. तर देशाला नवा आदर्शवाद द्यायचा आहे व राजकीय संस्कृती द्यायची आहे, असे दीनदयाळजी म्हणायचे. आज पक्ष फोडणे, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेणे, एकाच कुटुंबातील चार, चार जणांना तिकीट देणे, कोणाशीही तडजोडी करणे, निवडणुकीत वारेमाप पैसे वाटणे, उद्योगपतींची धन करणे हे सारे दीनदयाळजींनी घालून दिलेल्या तत्त्वात बसते का?

 ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात ते म्हणाले होते की, जनसंघाला या देशाला नवीन नेतृत्व द्यायचे आहे. पण नेतृत्व निर्माण करण्याचे जुने मार्ग आता बदलले पाहिजेत. त्यासाठी शॉर्टकट असणार नाही. योग्य मार्गानेच आपण पुढे गेले पाहिजे…. पण आज भाजप योग्य मार्गानेच वाटचाल करत आहे का? भ्रष्टाचाराचा पंडितजींना तिटकारा होता.

आज जर दीनदयाळजी असते, तर त्यांना काय वाटले असते?.. भाजपमधील काही गलेलठ्ठ नेते बघून त्यांचे काळीज विदीर्ण झाले नसते का? भारतीय जनसंघाचे अध्यक्ष झाल्यावरही त्यांचे वागणे स्वयंसेवक म्हणूनच असायचे. दीनदयाळजी हे अत्यंत साधे होते. आज अशाप्रकारचे किती नेते भाजपमध्ये आहेत?

भाजपखेरीज बाकी सर्व पक्ष हे गयेगुजरे व भ्रष्ट आहेत आणि भाजप हा एक महान नीतिमान पक्ष आहे, हे जागतिक सत्य आहे. विश्वगुरूंनी हे सातत्याने अधोरेखित केलेलेच आहे…परंतु आज पंडित दीनदयाळजी असते, तर त्यांनाही असेच वाटले असते का? ते एक आपल्या हिंदुत्ववादी विचारांवर आणि एकात्म मानवतावादावर श्रद्धा असलेले प्रामाणिक व साधे नेते आणि मूलतः चिंतक होते. दीनदयाळजी आणि अजितदादा यांची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले की, ते राजकारण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूबद्दल सवाल उपस्थित केले, तर ते मात्र राजकारण नाही, असे आपण मानायचे का?.. विचार करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here