Home महाराष्ट्र भारतीय संविधान आणि धार्मिक सद्भावना : राष्ट्राच्या आत्म्याला जोडणारा अमृतसूत्र

भारतीय संविधान आणि धार्मिक सद्भावना : राष्ट्राच्या आत्म्याला जोडणारा अमृतसूत्र

101

भारतीय इतिहासाच्या दीर्घ, विविधतेने नटलेल्या प्रवासात धर्म, अध्यात्म, संस्कृती आणि मानवी मूल्ये ही आपल्या समाजरचनेची मूलभूत शक्ती राहिली आहेत. विविध धर्मांचे, परंपरांचे, भाषांचे आणि जातीजमातींचे असंख्य प्रवाह येथे एकत्र येऊन एक विशाल, सशक्त आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय ओळख घडवतात. या अनंत वैविध्याला एकत्र बांधणारा, सर्वांना समान न्याय देणारा आणि सहअस्तित्वाची हमी देणारा पाया म्हणजे भारतीय संविधान. आजच्या अशांत, ध्रुवीकरणाच्या आणि अनेकदा तणावग्रस्त वातावरणात धार्मिक सद्भावना ही फक्त सामाजिक गरज नसून राष्ट्राच्या अस्तित्वाची आणि प्रगतीची अनिवार्य अट बनली आहे. म्हणूनच भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची नव्याने उजळणी करण्याची वेळ पुन्हा-पुन्हा येत राहते.

          १४ वर्षांच्या एका स्वातंत्र्य संग्रामानंतर, मोठ्या बलिदानांनी आणि दिव्य स्वप्नांनी भारताने स्वतःचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. परंतु स्वातंत्र्य मिळवणे हे पहिलं पाऊल; स्वातंत्र्य टिकवणे, त्याला योग्य दिशा देणे आणि सर्वांना समान अधिकार देणारी चौकट तयार करणे हे दुसरे आणि अधिक कठीण पाऊल होते, हाच संविधानाचा पाया आणि त्यात धर्मनिरपेक्षता आणि समानता आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत दिलेली तत्वे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही केवळ शब्दरचना नाहीत, तर भारतीय समाजव्यवस्थेला एकत्र ठेवणारा विचारस्रोत आहेत. यातील बंधुता हे मूल्य धार्मिक सद्भावनेचे मुख्य आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप हे कोणत्याही धर्माचा अवमान करणारे नाही, तर सर्व धर्मांना समान मान देणारी, प्रत्येक नागरिकाला मन, वाणी आणि आचरणस्वातंत्र्य देणारी न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचे पालन करणे, प्रचार करणे आणि प्रसार करणे हा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.

         धर्म हा मानवी अंत:करणाचा विषय. परंतु धर्माच्या नावाने रक्तपात, द्वेष किंवा भिंती उभारल्या गेल्या की, तो धर्म नसून अहंकाराचे, भीतीचे आणि चुकीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ठरतात. संविधान म्हणते धर्म श्रद्धेचा विषय आहे, शासनाचा नाही. शासनाचे काम सर्वांना समान संधी आणि समता देणे, तर समाजाचे काम परस्पर सन्मानाची संस्कृती पोसणे. आज भारत जगाच्या रंगमंचावर सार्वभौम शक्ती म्हणून पुढे जात असताना, धार्मिक विविधता ही आपली अडचण नव्हे; उलट आपली ताकद, आपला सांस्कृतिक साठा, धर्म, वैयक्तिक श्रद्धा, समाजासाठी जबाबदारी आणि जगाला दिलेला अद्वितीय संदेश आहे. धार्मिक सद्भावनेचा भारतीय अनुभव आणि सह-अस्तित्वाची हजारो वर्षांची परंपरा भारताच्या भूमीत बुद्ध, महावीर, कबीर, नानक, तुकाराम, परमेश्वरांच्या विविध अवतारांची शिकवण, तसेच सूफी संतांची प्रेमभक्ती भिनलेली आहे. प्रत्येकाने एकच संदेश दिला, मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. भारतीय संस्कृती शिकवते की, “वसुधैव कुटुंबकम्” संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब. यामुळेच येथे हिंदू-मुस्लिम-सिख-ख्रिश्चन-जैन-बौद्ध-लिंगायत-पारशी असे अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संस्कृती फुलल्या, वाढल्या आणि एकमेकांत सामावल्या. धार्मिक सद्भावना नैसर्गिक आहे; द्वेष हा कृत्रिम, राजकीय आणि स्वार्थी हेतूंनी निर्माण होणारा.

       संविधानाचे संरक्षण हे फक्त न्यायालयाचे नव्हे, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संविधान रचून देणे हे एक कार्य; पण ते जगवणे हा एक नित्य संघर्ष आहे. आज सोशल मीडिया, अफवा, कट्टरता आणि राजकीय ध्रुवीकरणामुळे धार्मिक भावनांचा गैरवापर सतत होताना दिसतो. अशा काळात नागरिकांनी अधिक सजग व्हायला हवे. पण प्रश्न असा आहे की, धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या शक्तींना आपण रोखणार की नि:शब्द उभे राहणार? संविधान सांगते समानता, पण समाजाने ती जपायला हवी. संविधान सांगते बंधुता, पण नागरिकांनी ती अभ्यासायला हवी. संविधान सांगते स्वातंत्र्य, पण आपण त्याचा दुरुपयोग टाळायला हवा. भारतीय संविधान धार्मिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पाया आहे. धार्मिक शांतता हे फक्त सामाजिक सुख-शांतीचे साधन नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचा आणि आर्थिक प्रगतीचा पाया आहे. ज्या देशात आंतरिक सौहार्द आहे, तिथे उद्योग येतात, शिक्षण फुलते, रोजगार वाढतो आणि लोकांचा आत्मविश्वास बळकट होतो. धार्मिक तणाव समाजातील ऊर्जेला नष्ट करतो;

सद्भावना तीच ऊर्जा राष्ट्रनिर्मितीत वापरते.

       नव्या भारताला आस्थेची नव्हे, मूल्यांची गरज आहे. नवा भारत उभा राहत आहे. तंत्रज्ञानात, विज्ञानात,अर्थव्यवस्थेत, संरक्षणात. पण या नव्या भारताची आत्मा जुना आहे, मानवतावादी, उदार, सहिष्णू आणि सर्वधर्म समभावाची ओळख असलेला. धर्म हा व्यक्तीचा आणि संविधान हा राष्ट्राचा मार्ग आहे. दोन्ही मार्ग जुळले तर भारत जगाला प्रकाश देतो. भारतीय संविधान आपल्याला अधिकार देतं, स्वातंत्र्य देतं, न्याय देतं; परंतु तेच संविधान आपल्याकडून कर्तव्यांची पूर्तताही अपेक्षित ठेवते. उपसंहार, संविधान जपा, सद्भावना वाढवा, मानवता जिंकू द्या, धार्मिक सद्भावना जपणे हे व्यक्तीगत सुसंस्कारांचे, सामाजिक प्रगल्भतेचे आणि राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक आहे. आजच्या काळात आपण सर्वांनी एकच संकल्प करायला हवा. धर्माचे संरक्षण श्रद्धेने करू आणि राष्ट्राचे संरक्षण संविधानाने करू. विविधतेत एकता, एकतेत शक्ती, शक्तीत राष्ट्र हीच भारताची वाटचाल आहे.

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here