


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.17ऑक्टोबर):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन अधिक सक्षम आणि समन्वयपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील डोंगरला येथील आदिवासी समाजातील कार्यकर्ते डॉ. प्रणित जांभूळे यांची प्रदेश कार्यकारिणी आणि आदिवासी विभाग यांच्यातील संपर्क समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. जांभूळे यांच्या नियुक्तीमागे केवळ संघटनात्मक समन्वय नसून, राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या समस्या मुख्य प्रवाहात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्नही आहे. सध्याच्या महायुती सरकारच्या धोरणांमुळे आदिवासी समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडत असून, त्या विरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते.
उच्च शिक्षित आणि आदिवासी विषयांचे सखोल ज्ञान असलेले डॉ. प्रणित जांभूळे यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. युवक काँग्रेस आणि प्रशिक्षण विभागाच्या कामात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये त्यांच्या कार्याची छाप दिसून येते.
काँग्रेस विचारसरणीतून घडलेले डॉ. जांभूळे हे “संगम” प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षित कार्यकर्ते असून, त्यांनी पक्ष संघटनेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.
प्रदेश काँग्रेस आणि आदिवासी विभागामधील समन्वय अधिक सुदृढ करण्याचे काम डॉ. जांभूळे पुढे करतील. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशक्तीचा लाभ पक्षाला तसेच समाजाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.














