Home महाराष्ट्र मराठी विश्वकोशातील सर्वच चुका लवकरात लवकर दुरुस्त केल्या जाव्या-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक...

मराठी विश्वकोशातील सर्वच चुका लवकरात लवकर दुरुस्त केल्या जाव्या-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

150

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या मराठी विश्वकोशाच्या खंड १४ मध्ये नलगुंदकर लिखित लेखात महात्मा गांधींचा वध करण्यात आला होता असा असलेला उल्लेख बदलण्यात आला असून तिथे महात्मा गांधींचा खून करण्यात आला आहे असा लेख करण्यात आला आहे, अशी बातमी काही प्रमुख मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे विश्वकोशाच्या याच खंडात वसंत नगरकर लिखित लेखांमध्ये महात्मा गांधींवर गोळ्या झाडणारा प्रमुख आरोपी नथुराम गोडसे याचा आदरार्थी उल्लेख करण्यात आला होता, तो देखील बदलून एकेरीत उल्लेख केल्या असल्याचे या बातमीत म्हटले आहे. 

अशा प्रकारचा बदल करण्यात यावा यासाठी नागपुरातील प्रभाकर कोंडबतुनवार, डॉ.बबन नाखले, मधुकर मेहेकरे डॉ.हरीश धुरट आणि आनंद माजरखेडे प्रभृतींनी २०२० मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे एका याचिकेद्वारे ही मागणी केली होती. त्यावर विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी हा बदल केल्याचे कळवले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. 

महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे गठन १९६० मध्येच झाले होते. प्रस्तुत चौदावा खंड १९८९ मध्ये प्रकाशित झाला होता. त्यात हा कथित उल्लेख झाला आहे. महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसे नामक व्यक्तीने गोळ्या झाडल्या होत्या. त्यात महात्मा गांधींचा मृत्यू झाला होता. त्याला महात्मा गांधींचा वध झाला असे त्यावेळी म्हटले गेले होते. एका वृत्तपत्राच्या बातमीत उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी वध हा शब्द रूढ केल्याचे बोल लिहिले गेले आहे. वध हा शब्द दुष्पवृत्तीच्या व्यक्तीची जर हत्या केली गेली तर त्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. रावण हा राक्षसी प्रवृत्तीचा होता. तसेच कंस हा देखील राक्षसी प्रवृत्तीचाच होता. त्यामुळे राम आणि कृष्ण या सत्प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्याची हत्या केली किंवा खून केला असे न म्हटले जाता त्याचा वध केला असे म्हटले जाते .एकूणच सत्प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दुष्प्रवृत्तीच्या व्यक्तींचा त्रास असह्य झाल्याने केलेली हत्या ही वध म्हणून ओळखली जाते. 

आता महात्मा गांधींचा वध की हत्या की खून या संदर्भात वाद होऊ शकतो. महात्मा गांधींचे समर्थक ही हत्याच होती किंवा खून होता असा दावा करतील. मात्र एक वर्ग हा वध होता असाच आग्रही दावा करेल. कारण भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाल्यावर ज्या निरपराध हिंदूंच्या हत्या झाल्या, त्यावेळी महात्मा गांधींनी घेतलेली भूमिका अनेकांना पसंत नव्हती, आणि त्यामुळे त्याबाबत नाराजी होती. म्हणून असे महात्मा गांधी विरोधक हा वधच होता असा आग्रह धरतील. मात्र ज्या नथुराम गोडसेने महात्माजींना गोळ्या घातल्या, त्याच्या परिवाराने देखील वध हा शब्द वापरलेला नाही. गोपाळ गोडसेंचे नाव या गांधी हत्येच्या कटात गोवले गेले होते. गोपाळ गोडसेंना माझ्या माहितीप्रमाणे त्याबाबत जन्मठेप देखील झाली होती. त्यातून मुक्त झाल्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक सुद्धा “गांधी हत्या आणि मी” असेच आहे. त्यामुळे उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी वध हा शब्द रूढ केला हा आरोप काहीसा चुकीचा वाटतो. 

दुसरे असे की गांधी हत्या झाली तेव्हा देशात सर्वत्र काँग्रेसचाच बोलबाला होता. त्यामुळे उजव्या विचारांच्या व्यक्तींनी वध हा शब्द रूढ केला असेलही. तरी तो रूढ झाल्यावर काँग्रेसचे मंडळींनी कधीच आक्षेप घेतला नव्हता. १९८९ मध्ये ज्यावेळी मराठी विश्वकोशाचा १४ वा खंड प्रकाशित झाला त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. नंतरही २०१४ पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच सत्तेत होती. त्या काळात हा बदल का झाला नाही असाही मुद्दा उपस्थित होतो. २०२० मध्ये ही मागणी केली गेली आणि त्यानंतर हा बदल झाला आहे हे त्या वृत्तावरून स्पष्ट दिसते. 

या संदर्भात मराठी विश्वकोश मंडळाचे सध्याचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २०२० मध्ये अशी याचिका मंडळाकडे आली होती, आणि त्यानुसार २०२२ मध्ये विश्वकोशात हा बदल झालेला आहे अशी माहिती दिली. त्यावेळी हा बदल झाला त्यावेळी डॉ. रवींद्र शोभणे हे विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष नव्हतेच. त्यावेळी राजा दीक्षित हे मंडळाचे अध्यक्ष होते, आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेत होते. 

जर हा बदल २०२२ मध्येच झाला असेल तर २०२२ मध्ये हे वृत्त प्रसारित करून या संदर्भात चर्चा निर्माण करण्यामागे याचिकाकर्त्यांचा नेमका काय हेतू आहे हे लक्षात येत नाही. प्रस्तुत बातमीत नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक होता असा उल्लेख आहे. सध्या संघाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. नेमका त्याच दरम्यान हा प्रचार करून जनसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा तर हा प्रकार नाही ना अशी मनात शंका निर्माण होते. त्याचबरोबर बदल राजा दीक्षित यांच्या काळात झाला असला तरी डॉ. रवींद्र शोभणेंचे नाव वृत्तात टाकून देखील शोभणेंना कुठेतरी एक्सपोज करण्याचा तर हा प्रकार नाही ना अशीही शंका घेण्यास निश्चित वाव आहे. 

नथुराम गोडसे हा संघाचा स्वयंसेवक होता असा आरोप ज्यावेळी महात्मा गांधींची हत्या गोडसेने केली त्याचवेळी झाला होता. त्यामुळेच तत्कालीन नेहरू सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी देखील घातली होती. नंतर ही बंदी उठवण्यात देखील आली होती. विविध चौकशी आयोगांनी चौकशी केल्यानंतर महात्मा गांधींवरील झालेल्या या गोळीबाराच्या कटामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुरानवयानेही संबंध नाही हे सिद्ध झाले होते. तरीही संघ शताब्दीच्या या काळात पुन्हा एकदा बुद्धीभ्रम निर्माण करण्याचा हा डाव तर नाही ना अशी देखील शंका घेण्यास वाव आहे.

मराठी विश्वकोशाचे बरेचसे खंड काँग्रेसच्याच राजवटीत प्रकाशित झालेले आहेत. साधारणपणे सत्ताधारी पक्षातील विचारधारेचा विश्वकोशाच्या जडणघडणीत प्रभाव असतो असे दिसून येते. विश्वकोश निर्मितीचे जे संपादक मंडळ असते ते देखील सत्ताधारी मंडळींनीच नियुक्त केलेले असते. त्यामुळे ते देखील सत्ताधाऱ्यांच्याच विचारांशी कुठेतरी बांधील असते असे बोलले जाते. विश्वकोश जर काळजीपूर्वक चाळला तर अजूनही काही चुकीचे उल्लेख सापडू शकतात, जे की बदलले जाणे निश्चितच गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास मराठी विश्वकोशाच्या अठराव्या खंडात १८५७ मध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी या मंडळींसह इतर अनेकांनी इंग्रज सरकार विरोधात उठाव केला होता असे उल्लेखित आहे. त्याचबरोबर नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे या सर्व योद्ध्यांचा या खंडात एकेरीत उल्लेख करण्यात आलेला आहे. 

वस्तूतः १८५७ मध्ये जे काही घडले तो उठाव नव्हता, किंवा बंडही नव्हते, तर ते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते असे म्हटले जाते. माझ्या माहितीप्रमाणे “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” या शीर्षकाचे एक पुस्तकही मराठीत उपलब्ध आहे. माझ्या आठवणीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते लिहिले आहे. त्याशिवाय इतर देखील अनेक लेखांमध्ये किंवा दस्तावेजामध्ये याचा उल्लेख १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध असाच करण्यात आला आहे. मात्र प्रशासनातील इंग्रज धार्जिण्या अधिकाऱ्यांनी असा बुद्धिभ्रम करणारा उल्लेख केलेला असू शकतो. त्याचप्रमाणे झाशीची राणी, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे ही सर्व नररत्ने महाराष्ट्रासाठी कायम आदरणीय राहिलेली आहेत. फक्त महाराष्ट्रात साठीच नाही पण इतरत्र देखील त्यांचा उल्लेख आदरानेच होतो. आज बऱ्याच शहरांमध्ये झाशीची राणी तसेच तात्या टोपे यांचे पुतळे देखील सन्मानाने उभारलेले आहेत. त्यांच्या नावाने नागपूर, भोपाळ येथे नगरे देखील उभारलेली आहेत. यावरून त्यांच्याबाबत जनसामान्यांमध्ये असलेली आदरभावना स्पष्ट व्हावी. 

मात्र मात्र महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण दस्तावेजात १८५७ ला भारतीय सैन्यातील काही व्यक्तींनी उठाव केला होता, तसेच त्याला बंडही म्हटले गेले होते असा उल्लेख आहे. त्याचबरोबर नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे या सर्वांचे एकेरीत उल्लेख आहेत. मराठी विश्वकोश हा चिरस्थायी दस्तावेज आहे. पुढल्या अनेक पिढ्या संदर्भासाठी विश्वकोश वापरणार आहेत. त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती जाणे हे कुठेतरी गैर ठरणार आहे. त्यामुळे ही दुरुस्ती देखील केली जावी अशी आमची विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याकडे मागणी आहे.

याचप्रमाणे इतर अजूनही काही चुकीच्या नोंदी या विश्वकोशाच्या सर्वच्या सर्व खंडांमध्ये झालेल्या असू शकतात. भारतात इंग्रज राज्यकर्ते असताना त्यांनी या देशाचा इतिहास आपल्या सोयीने लिहिला होता. त्याचप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारने असाच चुकीचा इतिहास कायम केला, नव्हे अजूनही चुकीचा इतिहास तयार केला. त्यात डाव्या मंडळींनी देखील हातभार लावला होता. त्यामुळे अनेक हुतात्मे दुर्लक्षित राहिले आहेत तर इतर लुंगे सुंगे, जे या भूमीचे शत्रू म्हणून ओळखले जायला हवे होते, ते राष्ट्रपुरुष दाखवले गेले आहेत. आजही औरंगजेब, शहाजहान, जहांगीर बहादूरशाह जफर, अशांच्या नावाने दिल्लीत रस्ते आहेत, तर अनेक हुतात्मे दुर्लक्षित राहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे एका पुस्तकात दरोडेखोर म्हणूनही उल्लेखिले गेले होते. आजही मोगल आणि इंग्रज राज्यकर्त्यांच्या नावे अनेक रस्ते गावे संस्था उभ्या आहेत आणि त्यांची आठवण करून देत आहेत.हा इतिहास देखील कुठेतरी बदलला जाऊन नेमके वास्तव जनसामान्यांसमोर यायलाच हवे असे जाणकारांचे मत आहे.

नेमके हेच वास्तव समोर यावे याचा प्रारंभ महाराष्ट्र विश्वकोश मंडळाने करावा असे सुचवावेसे वाटते. तसे झाले तर पूर्णतः निर्दोष दस्तावेज पुढल्या पिढ्यांसमोर जाईल आणि चुकीच्या माहितीमुळे होणारे गैरसमजही टळू शकतील. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला है…..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here