


प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गंगाखेड तालुक्यातील सकल बंजारा समाज बांधवांचा रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा निघाला तालुक्यातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलां, ज्येष्ठ नागरिक,युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी केली.
मोर्चाची सुरुवात स्व.वसंतराव नाईक चौक येथुन झाली.माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक,संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुजरा करण्यात आला.पुढे मुख्य मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोर्चामध्ये समाजाच्या मागण्या दर्शवणारे फलक, बॅनर आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण दणाणून गेले होते.
तहसील कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ नागरिक व युवकांनी प्रभावी भाषण केले. यावेळी बंजारा समाजाने आपल्या व्यथा मांडताना तीव्र असंतोष व्यक्त केला.आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे समाजातील शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक प्रगती थांबलेली असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रवर्गामध्ये तातडीने समाविष्ट करण्याची मागणीही ठामपणे करण्यात आली.
यानंतर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.मोर्चादरम्यान गंगाखेड पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चाने गंगाखेड शहरात एकजुटीचे दर्शन घडवले













