


सुनील शिरपुरे/यवतमाळ
झरीजामणी:ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी आणि मागील काही महिन्यांपासून चालू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आहे. माननीय लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत प्रकाश निमसरकर व पवन खुशाल कुळसंगे मित्रपरिवार यांनी सातत्याने प्रशासनाकडे केलेले निवेदन, चर्चासत्र आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून पांढरकवडा ते पाटण बस सेवा काल दि.५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. यामुळे पाटण गावाचा संपर्क मुख्य शहराशी सुकर होणार असून आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना मिळेल. प्रशांतभाऊ व पवनभाऊंच्या प्रयत्नामुळे आम्हाला प्रवासाचा हक्क मिळाला आहे. ही सेवा आमच्यासाठी वरदान ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी प्रशांत निमसरकर, पवन कुळसंगे व त्यांच्या मित्रपरिवाराचे मन:पूर्वक आभार मानत पुढील काळातही अशा विकासाभिमुख उपक्रमांतून त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पांढरकवडा-पाटण ही बस येताच सतपल्ली येथे चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बापुरावजी लक्षट्टीवार, तंटामुक्त अध्यक्ष गोवर्धन मेंगावार, दत्ता मेडपटलावार, राजुभाऊ लक्षट्टीवार, अनिल मोहजे, प्रशांत निमसरकर, पवन कुळसंगे, दत्ताभाऊ परचाके व प्रशांत निमसरकर मित्रपरिवार सतपल्ली हे उपस्थित होते.














