


नागेश खूपसे-पाटील
(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)
सोलापूर – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील स्वच्छता व रस्त्यांची स्थिती तपासण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली.
त्यांनी रामलाल चौक ते सरस्वती चौक, शुभराय आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड, नवी वेस पोलीस चौकी ते व्हीआयपी रोड, पांजरापुळ चौक ते निराळे वस्ती, शेटे वस्ती आणि आंम्बेसीटर हॉटेल परिसर या मार्गांवर प्रत्यक्ष भेट देत रस्त्यांची दुरवस्था आणि कचऱ्याच्या साच्याची पाहणी केली.
तसेच, दुकान, हॉस्पिटल आणि घरगुती मिळकतींच्या मिळकत कर नोंदणीचीही तपासणी करून चुकीच्या कर वर्गीकरणाचे प्रकार आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य नोंद घेण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
कचरा व्यवस्थापनावरही त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आरोग्याला धोका पोहोचवतो. स्वच्छता विभागाने दररोज ठरावीक वेळेत सफाई करून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे,” असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, सह अभियंता प्रकाश दिवाणजी, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत तसेच अन्य विभाग प्रमुख व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.














