Home लेख गोंडवन पेटले आहे -मानवमुक्तीचे आक्रंदन

गोंडवन पेटले आहे -मानवमुक्तीचे आक्रंदन

160

 

कवी विनायक तुमराम यांचा गोंडवन पेटले आहे या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच वाचण्यात आली. या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती 1987 ला प्रकाशित झाली होती. दुसरी आवृत्ती 26 नोव्हेंबर 2024 ला प्रकाशित करण्यात आली.

कवी विनायक तुमराम हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने संघर्ष करणारे कवी आहेत. म्हणून त्यांची कविता ही चळवळीची कविता आहे पारंपरिक व्यवस्थेला आव्हान देऊन ; स्वतःच्या संस्कृतीच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचे काम त्यांची कविता करताना दिसते .

आदिवासी हे या देशाचे मूळमालक आहेत .पण त्यांना मानवी समाजापासून दूर ठेवल्या गेल्याने त्यांचा फारसा विकास झाला नाही. आज ही ते आपल्या विकासापासून कोस दूर आहेत; असे लक्षात येते. ते दूर का राहिले? यांचे अनेक प्रश्न कवीने आपल्या कवितेतून प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेले आहेत.

आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक आहे. ते कधीही देव व धर्म यांच्या चक्रव्यूहात न पडता जल,जंगल व जमीन याच्या वास्तव जीवनाला आपली संस्कृती मानली आहे. आदिवासी समाज हा या देशाचा मालक असताना ते का मागे राहिले यांचे कारण आपण समजून घेतले पाहिजेत .

गोंडवन पेटले आहे हे शीर्षकच क्रांतीचा उद्घोष करणारे आहे. आम्हाला आमचे अधिकार पाहिजेत, ते आम्ही लढवून मिळवणार हा आशावाद त्यांच्या कवितेतून प्रस्फुटीत झालेला आहे. अक्षयकुमार काळे आपल्या प्रस्तावनात लिहितात की, आपला प्रदेश, आपली अस्मिता, आपली माणसे याविषयी निरतिशय प्रेमाची जाणीव कवी व्यक्त करतो. गोंडवनातील आदिपुत्रांचे घायाळ जगणे कवीच्या जगण्याला सतत आव्हान देते .मुक्तीच्या नवा वाटा दाखवते. कधी – काळी स्वतंत्र असणारा हा आदिपुत्र आर्याच्या कपटी आणि संहारक नीतीचा बळी झाला. त्यांच्या जखमांना वल्कलांच्या वस्त्रांनी प्रक्षाळले ते या गोंडवनाने, पहाडांच्या अंधारकपारीत त्यांना आश्रय दिला. त्या अनार्यवनाबद्दलचे प्रेम त्यांच्या अंतकरणात दाटून येते. हे निरीक्षण कवीच्या कवितेचे सामर्थ्य तळे समजून सांगणारे आहे .

कवीची कविता वेगवेगळे संदर्भ शोधत आहे. असाच संदर्भ ते माझा जन्मसंदर्भ या कवितेत मांडताना लिहितात की,

उलगुलान कुळाशी माझा जन्म संदर्भ आहे
आणि शोधतो आहे आजही..
………….
मी शोधत आहे तो अग्निमित्र
जो निळ्या पहाटेचे संदर्भ पेटविल..

कवीचा मुख्य पिंड हा तत्वज्ञानाचा आहे. ते कार्यकारणभावाच्या सिद्धांतातून आपल्या पूर्वजावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध शोध घेत आहेत. ही भूमिका कवितेला नवा आशय देणारी आहे.

गोंडवन पेटले आहे यामधील कवितेचा आशय व विचार सूत्र हे परिवर्तनाला नवी दिशा देणारी आहे. गतकाळाचा हिशोब मागण्यासाठी त्यांची कविता स्वतःचे सत्व निर्माण करत आहेहे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कवी विनायक तुमराम यांचे चिंतन अत्यंत गहन व सुक्ष्मातीसूक्ष्म आहे. आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाचा विषय त्यांच्या कवितेचा गाभा आहे वनपुत्रांची वेदना ही कविता प्रचलित व्यवस्थेला जाब विचारणारी आहे. दगडांचे देव जे पुजतात त्यांना आमच्या उध्वस्त युगाच्या वेदना कशा समजणार..? आमचे स्वातंत्र्य कसे नागावले गेले? असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या कवितेतून विचारलेले आहेत. ते लिहितात की,

असले जरी पक्षास तुमच्या
बळ ह्या युगाचे अन सत्तेचे
उध्वस्त होईस्तोवरी तरी
आम्ही लढूच युद्ध हे मुक्तीचे..

आम्हाला आता थांबणे मंजूर नाही. आम्हाला आमचे युद्ध लढावेच लागेल. जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही ,तोपर्यंत कारण उद्याचा सूर्य आमचाच असेल हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे.ते लिहितात की,

पण आता उपेक्षिलेल्या सावल्यांच्या जाणिवेला
वेदनांचे गर्भ राहू लागले आहेत
अन विझलेल्या अस्तित्वांची अंधारलेली क्षितिजे
तेजाळू लागली आहेत
दास्यत्वाची भयानक रात्र अजून संपली नाही
मनुच्या वारसदारांच्या भयानक वर्णवादी आवाज
अजूनही भेदून जातो आहे
माणुसकीची निरव शांती
रात्रीच्या काड्या भयान अंधारात आमच्या आयुष्याचा क्रूर वध
दिसू लागेल उद्याच्या प्रकाशात कारण उद्याचा सूर्य आमचाच आहे..

गोंडवन पेटले आहे या कविता संग्रहातील सर्वच कविता कवीच्या अंतकरणातील संवेदनातून व्यक्त झाल्या आहेत. शब्दाचे अचूक बाण चपलक कवितेत बसल्याने ही कविता विद्रोही आहेत. पण सयंत आहे. हा सयंतपणाच कवीच्या भाव गर्भाचा तळ ढवळून काढतो आहे. ते माझे आयुष्य- एक रणभूमी यामध्ये व्यक्त होताना लिहितात की,

माझे आयुष्यच झाले आहे आता रक्तबंबाळ झालेल्या रणभूमीसारखे जिथे माझ्या लक्षवेधाला फक्त
दिसते आहेत तुमच्यातील शिखंडीचे षंडत्व

कवीला शत्रू कोण आणि मित्र कोण आहेत हे समजले असल्याने गोंडवन पेटले आहे यामधून नव्या क्षितिजाचा शोधते घेत आहेत. गोंडवन म्हणजे मानवी संस्कृतीच्या निर्मितीच्या महाप्रकल्पच होय.पण या गोंडवनातील संस्कृतीला गुलाम करून त्यांचे माणूसपण हिरावून घेतले होते. अशा गुलाम करणार्‍या संस्कृतीला कवी नाकारत आहे. गोंडवन या कवितेतून आपल्या अस्तित्वाचा शोध घेताना ते लिहितात की,

ज्या आर्ययुगात
मनुयुगात
शोषणयुगात
ज्यांनी धिक्कारले तुझ्या आदिपुत्रांचे लाचार आयुष्य
अन केली क्रूर थट्टा त्यांच्या
आदिम संस्कृतीची
तुझी शपथ घेऊन सांगतो आहे गोंडवना!
ते सर्व येत्या क्रांतीयुगाचे शत्रू असतील..

या कवितेतून नवा आशावाद वाचकाला दिलेला आहे. मनु व्यवस्थेचा नायनाट होऊनही आजही मनुवाद भारतीय समाजमनाला चिकटून बसलेला आहे .या मनुवादाला मूठमाती देऊनच नवा माणूस घडवता येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाळून नवे क्रांतीत्व निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वैचारिक क्रांतीतून उद्याचा सूर्य आपला असेल असा संदेश कवीने यामधून दिलेला आहे.

या कवितासंग्रहात व्यक्तिरेखावर अनेक कविता निर्माण झालेले आहेत. आपल्या समाजातील आदर्श पुरुषाच्या कार्यावर काव्यरचना झाल्याने आपल्या इतिहासाच्या खानाखुणा तपासण्याचे काम कवीने केले आहे .त्यामुळे ही कविता अत्यंत क्रांतिकारी अशी ठरलेली आहे. एकलव्य ,वर्णबळी सूर्यपुत्र, बिहारचा क्रांतीसूर्य -बिरसा भगवान, गंडामंडल्याची महाराणी दुर्गावती, गोंडवनातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, क्रांतिवीर नारायणसिंग उईके या कवितामधून आदिवासी संस्कृतीचे खरे महानायक समजून घेता येतात. त्याचा त्याग व क्रांतीत्व हेच कवीची खरी प्रेरणा आहे. ते एकलव्य या कवितेत लिहितात की,

मित्रवर! तुझ्या भात्यातील तळपणाचा तीक्ष्ण तीरांना
करणार आहे मी
क्रांतीच्या मशाली अन
तुझ्या अंगठ्यातून सांडलेल्या रक्ताने लिहणार आहे मी इथल्या सवर्णशाहीचा मृत्युलेख
कारण वेदनांनी भरलेले
तुझे उपेक्षित जीवन
मीही वर्णबळी म्हणून जगतो आहे..

ही कविता वर्तमानाचे खरे वास्तव दाखवणारी आहे. कवी विनायक तुमराम हे सत्य जाणिवाचा आलेख मांडणारे कवी आहेत. त्यांना रंजक व प्रणययुक्त कविता मान्य नाही .म्हणून या कवितेत क्रांती शिवाय अन्य कविता पाहायला मिळत नाही . इथली भाषा अत्यंत प्रभावी आहे. वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. नव्या वैचारिक क्रांतीला नवे संदर्भ देणारी आहे गोंडवन पेटले आहे या कवितासंग्रातील कविता आपल्या अस्तित्वाचा शोध घेत मानवमुक्तीचे आक्रंदन मांडणारी कविता आहे. आदिवासी जीवनाला नवे आत्मबल देणारी ही कविता भारतीय समाजातील लागलेल्या मानवद्रोही व्यवस्थेचा चेहरा उघड करणारी आहे.त्यांच्या कवितेने आदिवासी समाजाचे भावचित्र अत्यंत वास्तगर्भी रेखांकित केले आहे.त्याची कविता मुजोर व्यवस्थेला न घाबरता पुराणगढीला उध्वस्त करत निघाली आहे. त्यांच्या पुढील काव्य प्रवासासाठी मी सुयश चिंतितो …

संदीप गायकवाड ,नागपूर
9637357400

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here