Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा पाया मजबूत करणे आवश्यक- प्रा.अरुण बुंदेले ...

विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा पाया मजबूत करणे आवश्यक- प्रा.अरुण बुंदेले पोदार मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन

198

 

अमरावती (प्रतिनिधी)
” प्राकृतचे आधुनिक रूप असलेल्या मराठी भाषेमध्ये अनेक श्रेष्ठ व महान साहित्य कृती निर्माण झाल्या. ‘साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मानावी’ या विचारांचे श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. कारण त्यांचे मराठी साहित्यातील योगदान हे अनमोल आहे.शिक्षणाकरिता इंग्रजी महत्त्वाचे वाटत असले तरी मातृभाषेत लिहिणे व बोलणे यात निष्णात असणे त्यापेक्षाही महत्वाचे आहे ; म्हणून मराठी भाषा कार्यशाळेतून मी मराठी वर्णमालेपासून प्रारंभ केला कारण विद्यार्थ्यांचा मराठीभाषेचा पाया मजबूत झाला तर तो मराठी भाषेची इमारत पुढे चांगल्या प्रकारे उभी करू शकतो.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही मराठी भाषिकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.मराठी भाषेचीअस्मिता मराठी माणसाने जपली पाहिजे.” असे विचार विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते सुपरिचित शैक्षणिक संस्था पोदार इंटरनॅशनल स्कूल, कठोरा रोड,अमरावती येथे दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषा कार्यशाळेचे मार्गदर्शक व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते या पदावरून विचार व्यक्त करीत होते.
मराठी भाषा गौरव दिनाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर महाजन तर प्रमुख वक्ते व मराठी भाषा कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले होते.
प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अध्यक्ष प्राचार्य सुधीर महाजन यांनी केला.

सुपरिचित शैक्षणिक संस्था पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी विभागामध्ये सुपरिचित आहे, याच परिवेशामध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी पोदार शाळेमध्ये मराठी भाषा समृद्धीसाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचा ओनामा महाराष्ट्रगीताने झाला. त्यानंतर मराठी गौरवगीताचे गायन तसेच नृत्य सादर करण्यात आले. प्रा.अरुण बुंदेले यांनी मराठी भाषा संवर्धन या स्वरचित अभंगाचे गायन केले. या भव्य उत्सवामध्ये पोदारच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या महान नायकांच्या वेशभुषेमध्ये आपली कला सादर करीत परिसर दुमदुमून टाकला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन प्रमुख वक्ते प्रा. अरुण बुंदेले व प्राचार्य सुधीर महाजन यांनी केले .

याप्रसंगी मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा प्राचार्य सुधीर महाजन व प्रा.अरुण बुंदेले यांच्या हस्ते बक्षीस तसेच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
—-

प्रा.अरुण बुंदेले यांनी केले मराठी भाषा कार्यशाळेतून प्रबोधन

 

कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘मराठी भाषेचे संरक्षण,संगोपण व संवर्धन’ या विषयावर मराठी भाषातज्ज्ञ प्रा.अरुण बुंदेले यांची ” मराठी भाषा कार्यशाळा ” आयोजित करण्यात आली. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना
मराठी भाषेची वर्णमाला, शुद्धलेखनाचे व वळणदार हस्ताक्षरांचे नियम व महत्त्व, मराठी व्याकरण, मराठी विषयाची अध्ययन माला याविषयी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून मार्गदर्शन करून दैनंदिन जीवनात मराठी भाषेचे महत्त्व विषद केले.
——-

मराठीचे मराठीपण जपण्यासाठी एकत्रित कार्य करणे आवश्यक-प्राचार्य सुधीर महाजन

 

प्राचार्य सुधीर महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये, “पंढरीचा पांडुरंग जसे महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत तसे कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे म्हणून त्यांच्या जयंतीदिनी असलेल्या मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी,मराठी भाषेचे मराठीपण जपण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे कार्य करू या,मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवू या.”असे विचार व्यक्त करीत उपस्थितांना राष्ट्रीय शिक्षण प्रणालीनुसार मराठी भाषेच्या उपयोगीतेला अधोरेखित केले.

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन स्वाती पांडे, रुपा धांडे, रुपाली गव्हाणे आणि सोनाली मांजरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सुधीर महाजन यांच्या नेतृत्वात उपप्राचार्या अर्चना देशपांडे, अपर्णा शेळके, डॉ. आशिष खुळे,पल्लवी मोहोड, रागीनी भोजने, चेतन शहाकार, अर्चना पुंड,प्रिया गेडाम तसेच पोदार फॅकल्टी व्दारे अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here