


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.24फेब्रुवारी):-प्रगती आणि आधुनिकतेच्या नावावर मानवाने पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. आज ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम मानवाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत आहेत. ध्वनी प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेवून सर्वांनी आपापल्या परीने त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी द्वारा “ध्वनी प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना ” या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
प्राचार्य डॉ. देवेश कांबळे आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की आजकाल शाळा आणि कॉलेजच्या परिसरात डीजेच्या वापरामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधे मानसिक ताण आणि चिडचिडेपणा वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा आवाजामुळे अनेकांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकारामुळे अकस्मात मृत्यूचा सामना करावा लागत आहे तेव्हा सर्वांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रुपेश मेश्राम यांनी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे विविध उपाय यावर सखोल भाष्य करताना समोरच्या व्यक्तीला एकू जाईल त्यापेक्षा मुद्दाम जास्त जोराने बोलणे हा देखील ध्वनी प्रदूषणाचा प्रकार आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.














