


कराड: (दि.२९, प्रतिनिधी) “राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून एन.एस.एस हा उपक्रम चालवला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रम करण्याचे संस्कार होत असतात. त्यांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते. या शिबिराच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचे काम स्वयंसेवकांच्या मार्फत होत असते. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा नारा देऊन खेड्यांच्या विकासाची चळवळ उभी केली. ती आपण पुढे घेऊन जाऊया. किवळ गाव हे आपणास सर्व सहकार्य करेल.”, असे प्रतिपादन उदघाटक व प्रमुख पाहुणे माननीय श्री. बाळासाहेब पाटील(माजी सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री, सातारा जिल्हा) यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रदीप काशीद म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरांमधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते.”
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्री. अरुण (काका) पाटील (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्री. भास्करराव कुलकर्णी (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्री. तानाजीराव साळुंखे (माजी उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, मुंबई), मा. श्रीमती संगिता साळुंखे (माई) (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), मा. श्री रामचंद्र मारुती साळुंखे (उपाध्यक्ष, तंटामुक्ती समिती, किवळ), मा. श्री. उत्तमराव साळुंखे (माजी पोलीस उपअधिक्षक), मा. श्री. भानुदास साळुंखे (अध्यक्ष संत नावजीनाथ देवस्थान समिती, किवळ) तसेच मा.डॉ. एस .बी. केंगार सर (प्राचार्य यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मा. डॉ. विजय मारुती साळुंखे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, किवळ), मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते. या शिबिरातून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच त्यांनी किवळ गावचे ऐतिहासिक महत्व विषद करून स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.”
मा. श्रीमती संगिता साळुंखे (माई) आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “एनएसएस स्वयंसेवक उत्तुंग यश प्राप्त केलेल्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे.”
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक वेणूताई चव्हाण कॉलेजचे मा. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांनी केले. शिबिराचा उद्देश एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी सांगितला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. श्रीमती. एस. पी. पाटील व प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे यांनी केले. या शिबिराच्या उदघाटन समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंसेवक तसेच मौजे किवळ येथील उपसरपंच मा. कैलास साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.













