


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड-सातारा(दि.29जानेवारी):-सद्या किरकोळ व भुरट्या चोऱ्या किंवा काही गंभीर घटना घडतं आहेत,ते रोखण्यासाठी प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यास अनेक घटना रोखण्यात यश येईल असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले.
म्हसवड येथे आयोजित केलेल्या पोलीस पाटील व पत्रकार सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या,या निवडणुका अतिशय शांततेत व चांगल्या वातावरणात पार पडल्या त्यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी निवडणूक यंत्रणा व पोलीस खात्याला मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या बरोबर या तालुक्यातील पत्रकार यांनी सुद्धा निवडणूक संबधी बातम्या योग्य रीतीने प्रसिद्ध करून प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल या घटकाचा छोटासा सत्कार करावा आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन आहे असे त्यांनी सांगितले.
निवडणूक व इतर कामाबरोबर चोऱ्या माऱ्या, भुरटे चोर, व काही गंभीर घटना घडण्यापूर्वी जर निदर्शनास आल्या तर नागरिकांना त्रास होणार नाही, म्हणून प्रत्येक गावात, दररोज पोलीस पाटलांचं सूक्ष्म लक्ष असाव, तुम्हाला नेहमी प्रश्न पडला पाहिजे की अनोळखी व्यक्ती कोण आहे, तो गावात संशयस्पद आहे का, पूर्वी कधी गावात आला होता का?आताच आला आहेका?, त्याचा व्यवसाय काय आहे,याची पहाणी करावी व आमच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी पोलीस पाटलांना केले.
माण व खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केले आहे, त्यांनी यापुढे आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन पत्रकारांना केले व सर्वांचे कौतुक केले.
म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलीस पाटील, पत्रकार आणि पोलीस यांनी हातात हात घालून काम केल्यास कोणतीच अडचण येणार नाही. यापुढे असंच चांगलं काम करूया असे त्यांनी सांगितले.
पत्रकार प्रतिनिधी म्हणून विठ्ठल काटकर सर यांनी मनोगत व्यक्त केले.
हरिभक्त पारायण पोलीस हवालदार शशिकांत खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.














