Home महाराष्ट्र जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची मदत तात्काळ वाटप करा !

जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची मदत तात्काळ वाटप करा !

148

▪️संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.15जानेवारी):-जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२३ – २४ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही.

फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाला व विमा कंपनीला निवेदन देऊन केली आहे. फळ पीक विमा मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी अनेक वेळा करून सुद्धा त्याला शासन व विमा कंपनीचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासन व विमा कंपनीला धारेवर धरण्यासाठी, रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा शासन व रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला देण्यात आला.

निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्या ऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्या ऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच शासनाकडून होतांना दिसत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. 8 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना देखील मोर्शी वरूड चांदुर बाजार तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यावधी रुपये रिलायन्स इन्शुरन्स कंपनी वाटप करण्यास दिरंगाई केल्या जात असल्यामुळे शासनाची फळ पीक विमा योजना ही संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या फायद्याची नसून विमा कंपनीच्या फायद्याची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२३ – २४ अंतर्गत अंबिया बहारामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूल मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपये भरून लाखो हेक्टर क्षेत्राचा आंबिया बहार फळपिक विमा काढला होता. मात्र फळ पीक विम्याचा 8 महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे मिळू न शकल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित आहे.

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या फळ पीक विम्याची मदत 15 दिवसात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here